मनोरंजन

जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना ‘नाफा जीवन गौरव – २०२५’ पुरस्कार!

भविष्यात ‘नाफा’च्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये काम करण्याचे स्वप्नं पूर्ण होतील”
– जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर

भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू, संयमी आणि संवेदनशील अभिनयाची अमोल खूण असणाऱ्या जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ (NAFA) तर्फे यंदाचा ‘नाफा जीवन गौरव पुरस्कार – २०२५’ सन्मानाने प्रदान करण्यात आला.

सॅन होजेतील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये २५ जुलै रोजी पार पडलेल्या भव्य ‘नाफा ग्लॅमरस फिल्म अवॉर्ड नाईट’ मध्ये हा सन्मान देण्यात आला. या दिमाखदार सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार, नाफाचे संस्थापक अभिजीत घोलप, तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार आणि रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाफा मराठी चित्रपट महोत्सवासाठी ‘बीएमएम’च्या ५७ महाराष्ट्र मंडळांचे सहकार्य

पुरस्कार स्वीकारताना भावूक होत अमोल पालेकर म्हणाले,

NAFA सारख्या व्यासपीठाच्या मदतीने हॉलिवूडमध्ये काम करण्याची माझी जुनी स्वप्नं आता पूर्ण होऊ शकतील. तुम्हा सर्वांचे मन:पूर्वक आभार.

त्यांनी यापूर्वी निकोल किडमन व अमिताभ बच्चन यांना घेऊन एक मराठी चित्रपट करायचा प्रयत्न केला होता, पण हॉलिवूड स्टुडिओच्या अटींमुळे प्रकल्प थांबवावा लागला होता. “NAFA सारखी संस्था त्यावेळी सोबत असती तर तो प्रकल्प नक्कीच साकार झाला असता,” असेही त्यांनी नमूद केले.

मराठी सिनेमा दिमाखात – कलाकारांचा मोठा सन्मान

या पुरस्कार सोहळ्यात ज्या कलाकारांचा विशेष सन्मान करण्यात आला त्यामध्ये:

मधुर भांडारकर, डॉ. मोहन आगाशे, सचिन खेडेकर, महेश कोठारे, अश्विनी भावे, सोनाली कुलकर्णी, स्वप्नील जोशी, अवधूत गुप्ते, आदिनाथ कोठारे, वैदेही परशुरामी यांचाही समावेश होता. रेड कार्पेटवर कलाकारांचे शानदार आगमन, लोकनृत्याचे रंगतदार सादरीकरण आणि रसिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया यामुळे अवॉर्ड नाईट संस्मरणीय ठरली.

अभिजीत घोलप यांचा गौरवोद्गार

नाफाचे संस्थापक अभिजीत घोलप यांनी अमोल पालेकर यांच्या सन्मानाबाबत सांगितले,

“त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने अनेक पिढ्यांचे मन जिंकले. ‘जुबिली स्टार’ अशी ओळख असलेल्या या महान कलावंताचा सन्मान म्हणजे आमच्यासाठी गौरवाची बाब आहे.”

हॉस्टेलमधून संरक्षणाच्या आघाडीवर: ‘अपोलियन डायनॅमिक्स’च्या जयंत आणि सौर्य यांची यशोगाथा

अमोल पालेकर – एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व

चित्रकार म्हणून सुरुवात करून, अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात ठसा उमटवणारे पालेकर ‘गोलमाल’, ‘छोटी सी बात’, ‘शांतता! कोर्ट चालू आहे’, ‘धूसर’, ‘अनाहत’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचे भाग राहिले आहेत. त्यांच्या अभिनयाची शैली आजही नव्या पिढीसाठी प्रेरणादायक आहे.