विठू माऊलीच्या ओढीने निघाली ‘साहित्य दिंडी’; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘पुस्तक वारी’चा दिमाखदार शुभारंभ!
पुणे:
“साहित्यातून संतांनी दाविला जगजेठी… तयाच्या भेटीला निघाली ‘साहित्य दिंडी’..!” याच भक्तीमय आणि ज्ञानमय ओळींचा गजर करत, आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातून ‘राज्यस्तरीय सक्षम महिला, समृद्ध साहित्य दिंडी’ पंढरीच्या वाटेने मार्गस्थ झाली. संतांनी ज्या साहित्यातून आणि भावपूर्ण ओव्यांतून विठ्ठल जनमानसात रुजवला, त्याच साहित्याला सोबत घेऊन ही आगळीवेगळी शब्दरूपी पांडुरंगाची वारी निघाली आहे.

राजेश पांडे यांच्या संकल्पनेतून साकारला अभूतपूर्व उपक्रम
विशेष म्हणजे, या संपूर्ण ‘साहित्य वारी’चे आयोजन नॅशनल बुक ट्रस्ट (NBT) चे विश्वस्त आणि भाजपा महाराष्ट्र चे नेते राजेश पांडे यांच्या अभिनव संकल्पनेतून आणि ठोस प्रयत्नांतून संभव झाले आहे. त्यांच्याच विशेष पुढाकाराने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग (NSS), राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT) आणि महाराष्ट्र साहित्य परिषद या तीन मोठ्या संस्थांनी एकत्र येत या उपक्रमाला मूर्त स्वरूप दिले. या निमित्ताने “स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी-पुस्तके आपल्या दारी!” हा सामाजिक आणि वाचन संस्कृतीचा संदेश वारकऱ्यांपर्यंत पोहोचवला जात आहे.

📖 दिमाखदार उद्घाटन सोहळा आणि मान्यवरांची उपस्थिती
विद्यापीठातील ‘संत ज्ञानेश्वर सभागृहात’ शिक्षण, साहित्य आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत, विद्यापीठ गीत आणि रासेयो (NSS) गीताने झाली. तसेच सन २०२५ मधील दिंडी उपक्रमाची एक विशेष संक्षिप्त चित्रफित (Documentary) या प्रसंगी दाखवण्यात आली.
या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध इतिहास संशोधक व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे आणि महाराष्ट्र साहित्य परिषद चे अध्यक्ष योगेश सोमन यांनी मार्गदर्शन केले.

व्यासपीठावरील प्रमुख उपस्थिती:
प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार.
राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. गणेश भामे.
व्यवस्थापन परिषद सदस्य: रवींद्र शिंगणापूरकर, सौ. बागेश्री मंठाळकर, डी. बी. पवार, डॉ. नितीन घोरपडे, संदीप पालवे, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे.
वित्त व लेखा अधिकारी डॉ. चारुशीला गायके, विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालक डॉ. सविता कुलकर्णी.

’पुस्तके आपल्या दारी’ : वाचन संस्कृती वाढवण्याचा संकल्प
श्री. राजेश पांडे यांनी या उपक्रमाचे महत्त्व सांगताना सोशल मीडियाद्वारे आवाहन केले की, “पुणे पुस्तक महोत्सवाच्या अभूतपूर्व यशानंतर पुणेकरांनी वाचन संस्कृतीला अधिक महत्त्व दिले आहे. हीच वाचन चळवळ आता ‘पंढरीची वारी, पुस्तके आपल्या दारी’ या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचणार आहे. या वारीतून संत साहित्याचा वारसा आणि आधुनिक ज्ञान यांची सांगड घालत अधिकाधिक नागरिकांना १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि पुणे पुस्तक महोत्सवाशी जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्व वारकरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा.”

🚶 विद्यापीठ प्रवेशद्वारातून पंढरीकडे प्रस्थान
उद्घाटन सत्र संपल्यानंतर विद्यापीठाच्या मुख्य इमारतीपासून ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंत अत्यंत शिस्तबद्ध आणि विलोभनीय दिंडी प्रस्थान सोहळा पार पडला. टाळ-मृदुंगाच्या गजर, हातात घेतलेले ग्रंथ आणि शिस्तीत चालणारे रासेयोचे (NSS) स्वयंसेवक यांनी संपूर्ण परिसर भक्तीमय केला था. ही दिंडी पुढील १५ दिवस पंढरीची वाट चालत, लाखो वारकरी भाविकांपर्यंत ज्ञानाचा आणि स्वच्छतेचा प्रकाश पोहोचवणार आहे.

