सामाजिक

तळेगाव दाभाडे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी सर्वत्र पाठिंबा मिळवण्याचे आवाहन

अॅड. रंजना भोसले यांची माहिती व भावनिक आवाहन

तळेगाव दाभाडे, २७ जुलै २०२५ — डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः काही काळ वास्तव्य केलेल्या तळेगाव दाभाडे येथे त्यांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक बहुजन हिताय बौद्ध विहार, माता रमाबाई चौक, सिद्धार्थ नगर, कल्याण (पूर्व) येथे पार पडली. या बैठकीचे नेतृत्व अध्यक्ष अॅड. रंजना रघुनाथ भोसले यांनी तर मार्गदर्शन मा. यशवंत मानखेडकर सर यांनी केले.

या बैठकीत ॲड. भोसले यांनी सांगितले की, “सन 1954 मध्ये देहू रोड येथे बाबासाहेबांनी प्रथम बुद्ध रूप धारण करून धम्मप्रवेश सुरू केला होता. याच परिसरात असलेल्या तळेगाव दाभाडे येथे त्यांनी 41 एकर जागा विकत घेऊन विद्यापीठ स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्या जागेवर त्यांनी बंगला बांधून काही काळ वास्तवही केले. हे स्वप्न मात्र अपूर्ण राहिले. 1960 मध्ये ती जागा प्रशासनाने विक्री केली. पण आज बाबासाहेबांच्या त्या ऐतिहासिक वास्तूस सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहे.”

स्मारकासाठी आरक्षित जागेचा लढा:
ॲड. भोसले यांनी सांगितले की, “स्मारकासाठी बंगल्या शेजारी असलेली भूखंड क्र. 29 ते 34 ही जमीन आम्ही 2008 पासून आरक्षित करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. नगरपरिषदेकडून सुधारित विकास योजनेत त्यास समाविष्ट करून शासनाकडे पाठवले असले तरी शासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता ती योजना 2013 मध्ये रद्द केली. त्यानंतर सातत्याने शासनाशी पत्रव्यवहार होत आहे, मात्र अद्याप समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही.”

समाजाच्या सहकार्याची गरज:
या पार्श्वभूमीवर संस्था आता ही 29 गुंठे (पाऊण एकर) जागा खरेदी करून त्या ठिकाणी स्मारक, बौद्ध प्रशिक्षण केंद्र, वाचनालय, स्पर्धा परीक्षा केंद्र आणि इतर उपक्रम उभारण्याचा मानस बाळगते. ही जमीन कोट्यवधी रुपयांची असून, ती विकत घेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरी अनुयायांनी तन-मन-धन अर्पण करून सहकार्य करावे, असे भावनिक आवाहन अॅड. भोसले यांनी केले.

या बैठकीस उपस्थित मान्यवर:
सागर रामभाऊ तायडे (पत्रकार, साहित्यिक, कामगार नेते), विनोद वावरे, दादासाहेब यादव, दिलीप जाधव, अमोल जगधने, माधुरी सपकाळे, ऍड. उदय रसाळ, शशिकांत सावंत, शालिनी औचार, वसंत सपकाळे, परमानंद मेश्राम, राजीव साळवी, अविनाश जाधव, भागवत बिराडे इत्यादी मान्यवरांनी या बैठकीस हजेरी लावली.

कार्यक्रमाचे संचालन व समन्वय:
प्रास्ताविक किसन थुल यांनी, सूत्रसंचालन सुरेश श्रीपत जाधव यांनी केले, तर आभार दादासाहेब यादव यांनी मानले.
यावेळी दादासाहेब यादव, सुरेश श्रीपत जाधव व अॅड. सुरज वासनिक यांची मुंबई समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

“हा ऐतिहासिक लढा केवळ तळेगावापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रासाठीचा आहे,” असे अॅड. रंजना भोसले यांनी ठामपणे सांगितले