शाळेच्या कँटीनमध्ये वडापावऐवजी इडली, कोलाऐवजी ताक; आरोग्यदायी पर्यायांसाठी एफडीएचा मोठा निर्णय
मुंबई:
“आरोग्यदायी पर्याय हा नेहमी सहज उपलब्ध होणारा पर्याय असावा. जेव्हा शाळेच्या कँटीनमध्ये वडापावची जागा इडली घेते आणि कोलाची जागा ताक घेते, तेव्हा हा केवळ एक छोटासा बदल वाटू शकतो. परंतु, मुलांच्या सवयी घडवणाऱ्या अन्न वातावरणातील हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा बदल आहे,”
असे प्रतिपादन अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी केले आहे. सोशल मीडियावर हा विचार मांडत त्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली आहे.
हॉटेल्समधील अस्वच्छता व निकृष्ट अन्नाबाबत ग्राहकांना आता करता येणार थेट तक्रार!
अन्न आणि औषध प्रशासन (FDA) व राज्य शिक्षण विभागाच्या संयुक्त आदेशानंतर मुंबईसह ठाण्यातील शाळांनी आपल्या कँटीनच्या मेनूमध्ये क्रांतिकारी बदल करण्यास सुरुवात केली आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता वडापाव, समोसे, तळलेले पदार्थ आणि शीतपेयांवर (Aerated Drinks) पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून त्यांच्या जागी इडली, डोसा, पोहे, शिरा, उपमा आणि ताक यांसारख्या पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे.
‘अन्न सुरक्षा आणि मानके (शाळकरी मुलांसाठी सुरक्षित अन्न आणि संतुलित आहार) नियम, २०२०’ ची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश शाळांना देण्यात आले आहेत. एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी जिल्हा परिषद सीईओ आणि शिक्षण आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत हे नियम तातडीने लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.
तुकाराम मुंढेंची धडाकेबाज कारवाई; मानवी आरोग्याशी खेळणाऱ्या अमेझॉन रिटेलचा परवाना निलंबित!
प्रमुख नियम आणि महत्त्वाचे बदल:
५० मीटरच्या परिघात बंदी: शाळेच्या ५० मीटर परिसरात जास्त चरबी, साखर आणि मीठ (HFSS) असलेले जंक फूड विकण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईसाठी एफडीएला तात्काळ माहिती देण्याचे निर्देश मुख्याध्यापकांना दिले आहेत.
पालकांसाठी डब्याची नियमावली: शाळांनी पालकांनाही मुलांच्या डब्यात जंक फूड न देता ताजे शिजवलेले अन्न आणि प्लास्टिकऐवजी स्टीलच्या डब्याचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
बर्थडे सेलिब्रेशनचा नवा ट्रेंड: आर्चडिओसेसन बोर्ड ऑफ एज्युकेशन (ABE), पोदार एज्युकेशन नेटवर्क आणि पूर्णा प्रज्ञा स्कूलसह अनेक संस्थांनी कँटीनचा मेनू पूर्णपणे बदलला आहे. शाळांमध्ये वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी केक आणि मिठाईऐवजी ताज्या फळांचा पर्याय दिला जात आहे.
या निर्णयाचे पालकांनी पूर्ण स्वागत केले असले तरी, शाळेच्या परिसराबाहेरील जंक फूड विक्रेत्यांवरही प्रशासनाने तितक्याच कडकडीने कारवाई करावी, अशी मागणी ‘इंडिया वाईड पेरेंट्स असोसिएशन’च्या अनुभा सहाय यांनी केली आहे.

