डोम्बिवलीत २५ ऑगस्टपासून राज्यस्तरीय हातमाग प्रदर्शनाचे भव्य आयोजन; मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
डोम्बिवली:
भारतीय हातमाग परंपरेचा वारसा जपणे आणि विणकरांच्या कौशल्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने डोम्बिवलीत २५ ऑगस्ट २०२६ रोजी ‘राज्यस्तरीय हातमाग प्रदर्शन २०२६’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. “My Handloom My Pride” (माझा हातमाग, माझा अभिमान) या संकल्पनेवर आधारित हे प्रदर्शन २५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६.०० वाजता सुरु होईल.
हे प्रदर्शन एम.आय.डी.सी. क्षेत्रातील के. व्ही. पेंढारकर कॉलेजजवळील सिटी मॉलच्या तळ मजल्यावरील हेरिटेज हॉलमध्ये आयोजित करण्यात आले आहे.
या राज्यस्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन वस्त्रउद्योग मंत्री संजय सुशिला वामन सावकारे यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाला परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री. आशिष आनंद दामले, कल्याण-डोम्बिवलीच्या महापौर ॲड. हर्षाली विजय चौधरी थविल, खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र दत्तात्रय चव्हाण, उपमहापौर राहुल वसंत दामले यांसह केंद्र व राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ मर्यादित (महाटेक्स), मुंबईचे प्रशासक तथा कार्यकारी संचालक दिपक खांडेकर यांच्या विभागातर्फे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून नागरिक व वस्त्रप्रेमींनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

