ठळक बातम्या

तुकाराम मुंढेंची धडाकेबाज कारवाई; मानवी आरोग्याशी खेळणाऱ्या अमेझॉन रिटेलचा परवाना निलंबित!

ठाणे: अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने धडाकेबाज कारवाई करत भिवंडी येथील ‘अमेझॉन रिटेल इंडिया प्रा. लि.’ कंपनीच्या गोदामाचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित केला आहे.

मानवी आरोग्यास अत्यंत घातक आणि मुदतबाह्य (Expired) ठरलेले अन्नपदार्थ नष्ट करण्याऐवजी ते पुन्हा बाजारात विक्रीसाठी पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी गोदामाच्या व्यवस्थापकासह दोन जणांवर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गोदामातून अन्नपदार्थ विक्रीसाठी पाठवण्यास आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

हॉटेल्समधील अस्वच्छता व निकृष्ट अन्नाबाबत ग्राहकांना आता करता येणार थेट तक्रार!

​१.५ टन मुदतबाह्य साठा जप्त; कायद्याचे गंभीर उल्लंघन

​ठाण्याचे अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद कांबळेकर आणि त्यांच्या पथकाने भिवंडी येथील सरवली परिसरातील अमेझॉन रिटेलच्या गोदामावर अचानक धाड टाकून तपासणी केली. या तपासणीदरम्यान गोदामात तब्बल १.५ टन (१ हजार ५०० किलो) मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा दडवून ठेवल्याचे आढळून आले.

​हा साठा मानवी आरोग्याला गंभीर धोका निर्माण करू शकत होता. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ च्या तरतुदींचे हे गंभीर उल्लंघन असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, परिमंडळ-१० चे सहाय्यक आयुक्त आणि परवाना अधिकारी योगेश ढाणे यांनी जनहित आणि जनआरोग्याचा विचार करून या गोदामाचा परवाना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.

​विल्हेवाट लावण्याऐवजी थेट बाजारात पुरवठा!

​अमेझॉन रिटेल इंडियाने या मुदतबाह्य अन्नपदार्थांची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी ‘आर. के. ट्रेडर्स’ नावाच्या एका एजन्सीची नियुक्ती केली होती. नियमानुसार हा माल नष्ट करणे बंधनकारक होते. मात्र, एजन्सी आणि कंपनीच्या व्यवस्थापनाने संगनमत करून हा घातक साठा नियमबाह्य पद्धतीने पुन्हा बाजारात सर्वसामान्य ग्राहकांच्या माथी मारण्यासाठी पाठवला.

​या बेकायदेशीर आणि मानवी जीवाशी खेळणाऱ्या प्रकारामुळे प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे.

हॉटेल्समध्ये पिण्याचे पाणी मोफत द्या, अन्यथा कठोर कारवाई; तुकाराम मुंढे यांचा हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना कडक इशारा

​व्यवस्थापकासह एजन्सी मालकावर गुन्हा दाखल

​याप्रकरणी पोलिसांनी कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला असून खालील जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे:

सोमशेखर कोनुर (फॅसिलिटी मॅनेजर, अमेझॉन रिटेल इंडिया)

रहमान के. (मालक, आर. के. ट्रेडर्स एजन्सी)

प्र​शासनाच्या या धडक कारवाईमुळे मुदतबाह्य अन्नपदार्थांचा काळाबाजार करणाऱ्या आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.