सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी, तर ठाणे जिल्ह्यात ३ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव संपन्न
रामराज्या’साठी आणि भीषण आपत्काळातून तारण्यासाठी साधनेला पर्याय नाही!
ठाणे:
“संपूर्ण जगावर घोंघावणारे तिसऱ्या विश्वयुद्धाचे संकट, वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीवघेण्या स्पर्धेमुळे समाजाला ग्रासलेले नैराश्य, अशा अत्यंत भीषण आणि अस्थिर परिस्थितीतून समाजाला तारण्यासाठी केवळ भौतिक उपाययोजना पुरेशा नाहीत. आज दिशाहीन झालेल्या समाजाला प्रभू श्रीरामांच्या आदर्शांवर आधारित ‘रामराज्याची’ नितांत आवश्यकता असून, त्यासाठी समाजाला साधनेचे आणि गुरुचरणांचे भक्कम आध्यात्मिक अधिष्ठान असणे अनिवार्य आहे,” असे ओजस्वी प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले.
सनातन संस्थेच्या वतीने ठाणे (पश्चिम) येथील सी.के.पी. हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मुख्य ‘गुरुपौर्णिमा महोत्सवात’ ते बोलत होते. या वर्षी संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, इंग्रजी, तेलुगु आणि मल्याळम् आदी विविध भाषांमध्ये देशभरात ८१ ठिकाणी, तर ठाणे जिल्ह्यात ठाणे, डोंबिवली आणि कल्याण या ठिकाणी हा सोहळा अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला.
गुरुकृपायोग साधनेमुळे उद्योगाची २५ टक्क्यांपर्यंत प्रगती – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई
कार्यक्रमात पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांनी आपले अनुभव मांडताना सांगितले की, “सनातन संस्थेने सांगितलेल्या ‘गुरुकृपायोग’ साधनेमुळे पितांबरी कुटुंबातील सुमारे १५०० अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक स्थैर्य, सकारात्मकता आणि कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे. यामुळे उद्योगाची प्रगती १० टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. तणावमुक्त वातावरण आणि सुसंवादासाठी ही साधना आजच्या काळातील सर्वात प्रभावी जीवनपद्धती ठरत आहे.”
आजचे दस्ताऐवजीकरण हेच उद्याचा इतिहास! – अॅड. उदय वारुंजीकर
प्रसिद्ध वकील अॅड. उदय वारुंजीकर यांनी दस्ताऐवजीकरणाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, “ज्ञान, संशोधन आणि अनुभवांचे अचूक व वेळेवर कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य दस्ताऐवजीकरण झाले, तर ते भविष्यात अमूल्य पुरावा ठरते. प्रत्येक साधकाने आपल्या कार्याची व अनुभवांची लेखी तसेच दृक्श्राव्य (ऑडिओ-व्हिडिओ) स्वरूपात नोंद ठेवायला हवी. आजचे दस्ताऐवजीकरण हाच उद्याचा इतिहास आणि महत्त्वाचा संदर्भ ठरणार आहे.”

विविध उपक्रम आणि पुस्तकाचे प्रकाशन
या महोत्सवाला ठाण्याच्या महापौर सौ. शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौर श्री. कृष्ण पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली.
सोहळ्याची सुरुवात श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमापूजनाने झाली. या प्रसंगी सनातन संस्था आणि संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कार्यावर आधारित लघुपट दाखवण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते सनातनच्या ‘गुरुकृपायोगाचे माहात्म्य’ या ई-बुकचे (E-Book) प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान स्वसंरक्षणाच्या सोप्या पद्धतींची प्रात्यक्षिके, धर्मरक्षकांचा सत्कार, रामराज्य स्थापनेचा संकल्प आणि भावपूर्ण नामजप करण्यात आला. आगामी युद्धाचे आणि आपत्काळाचे सावट पाहता सर्व हिंदूंनी प्रथमोपचार, अग्निशमन आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.
ऑनलाइन प्रसारणाला देश-विदेशातून मोठा प्रतिसाद
प्रत्यक्ष कार्यक्रमांसोबतच सनातन संस्थेच्या वतीने मराठी भाषेतील गुरुपौर्णिमा महोत्सवाचे थेट प्रसारण YouTube ([YouTube.com/@SSMarathi](https://YouTube.com/@SSMarathi)) वरून करण्यात आले. तसेच मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड आणि मल्याळम् भाषांतील ‘ऑनलाइन गुरुपौर्णिमा महोत्सवा’चा लाभ देश-विदेशातील हजारो भाविकांनी घेतला.

