Thursday, August 20, 2026
Latest:
ठळक बातम्या

KDMC: अनधिकृत बांधकामाची तक्रार करूनही ८ वर्षे कारवाई नाही, त्रस्त नागरिकांचे ९ आणि १५ ऑगस्ट रोजी आंदोलन केडीएमसीच्या कारभाराचा नमुनाच समोर

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील नांदिवली येथील हितेन वर्गीस म्हात्रे यांच्या मालकी हक्काच्या जागेवर अतिक्रमण करून दोन अनधिकृत गाळे बांधण्यात आले आहेत.त्याबाबत गेली तब्बल ८ वर्षापासून वारंवार तक्रार आणि पाठपुरावा करूनही केडीएमसी प्रशासनाने कारवाई केली नाही.त्यामुळे त्रस्त झालेल्या म्हात्रे परिवाराने आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

९ ऑगस्ट क्रांती दिनी केडीएमसी इ वार्ड कार्यालय येथे थाळी वाजविणे आणि १५ ऑगस्ट रोजी केडीएमसी मुख्यालय कल्याण येथे थाळी वाजविणे आंदोलन करण्यात येणार आहे. ऑगस्ट क्रांती दीन आणि स्वातंत्र्य दिन या महत्त्वाच्या दिवशी सर्वसामान्य नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ येते,यावरून केडीएमसीच्या कथित लोकाभिमुख कारभाराचा नमुनाच समोर आला आहे.

डोंबिवली विधानसभा मतदारसंघात धक्कादायक प्रकार जिवंत मतदारांना मयत दाखवून मतदार यादीतून नावे वगळली

नांदीवली येथील सर्वे नंबर ७४/१/ग हि हितेन म्हात्रे यांच्या मालकी हक्काची जागा आहे.तेथे केडीएमसीची कोणतीही परवानगी न घेता त्या जागेवर अतिक्रमण करून भवानी स्वीट आणि मातोश्री इंटरप्रायजेस नावाचे दोन व्यावसायिक गाळे बेकायदेशीररित्या बांधण्यात आले आहेत. याबाबत म्हात्रे यांनी इ प्रभाग क्षेत्र केडीएमसी प्रशासनाकडे २०१८ मध्ये तक्रार केली आहे.तसेच वारंवार स्मरण पत्र पाठवून पाठपुरावा करत आहेत.

केडीएमसी प्रशासनाने त्या तक्रारी नुसार संबंधितांना नोटीस बजावणे ,सुनावणी घेणे , अनधिकृत बांधकाम घोषित करणे ,संबंधितांवर गुन्हा दाखल करणे ,न्यायालयात दोषारोप दाखल करणे , त्या गाळ्यांचे विद्युत पुरवठा आणि पाणी पुरवठा खंडित करण्यासाठी संबंधित विभागास पत्र पाठविणे आदी प्रक्रिया पूर्ण केली आहे.मात्र त्यासाठी विक्रमी अशी तब्बल ८ वर्षे लागली.मात्र अजून पर्यंत त्या बेकायदेशीर गाळ्यावर निष्कासित करण्याची कारवाई केली गेली नाही.

डोंबिवलीत बीएलओ (BLO) राजकीय कार्यालयात? मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह

या प्रकरणी गेल्या ८ वर्षांत अनेक सहाय्यक आयुक्त, उपआयुक्त आणि आयुक्त यांच्या प्रत्यक्ष भेट घेऊन पाठपुरावा केला आहे. तसेच कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वतः आयुक्त महोदय यांना फोन करून कारवाई करण्यास सांगितले.मात्र तरीही प्रशासनाला कारवाई करण्यासाठी मुहूर्त मिळत नाही,अशी स्थिती आहे.

महापालिका प्रशासनाकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याबाबत होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ अखेर हितेन म्हात्रे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ९ ऑगस्ट क्रांती दिनी केडीएमसी इ वार्ड कार्यालय येथे थाळी वाजविणे,११ ऑगस्ट रोजी अनधिकृत बांधकाम नियंत्रक तथा उपआयुक्त यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन,१३ ऑगस्ट रोजी आयुक्त केडीएमसी यांच्या निवासस्थान येथे थाळी वाजविणे आणि १५ ऑगस्ट रोजी केडीएमसी मुख्यालय कल्याण येथे थाळी वाजविणे आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे.यावरून केडीएमसीचा अंधाधुंद कारभार समोर आला आहे.