महामार्गांवरील फलकांवरून ‘औरंगाबाद’, ‘अहमदनगर’ ही जुनी नावे हटवून ‘छत्रपती संभाजीनगर’, ‘अहिल्यानगर’ लिहिणार!
हिंदु जनजागृती समितीच्या पाठपुराव्याला यश; प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश
मुंबई:
महाराष्ट्र शासनाने राज्यातील काही शहरांचे नामकरण करून त्यांना नवीन अधिकृत नावे दिली आहेत. यामध्ये ‘औरंगाबाद’चे ‘छत्रपती संभाजीनगर’, ‘अहमदनगर’चे ‘अहिल्यानगर’ आणि ‘उस्मानाबाद’चे ‘धाराशिव’ असे बदल करण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही अनेक महामार्गांवरील दिशादर्शक फलकांवर (Signboards) जुनीच नावे दिसत आहेत.
ही जुनी नावे तत्काळ हटवून त्याजागी नवीन अधिकृत नावे लिहिण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले आहेत. हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने या संदर्भात घेतलेल्या भेटीनंतर मंत्र्यांनी हे निर्देश दिले.
समितीकडून मंत्र्यांची भेट आणि निवेदन
शासकीय राजपत्र (Gazette) प्रसिद्ध होऊनही महामार्गांवरील फलक न बदलल्याने हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
यावर तातडीने पावले उचलत मंत्र्यांनी, “ही नावे बदललीच पाहिजेत आणि यात तातडीने कारवाई झाली पाहिजे,” असे स्पष्ट केले. तसेच, या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना आजच कारवाई करण्याचे आदेश देत असल्याचे आश्वासन दिले. अशीच सकारात्मक भूमिका आणि आदेश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री श्री. इंद्रनील नाईक यांनीही दिले आहेत.
नवीन आणि जुन्या नावांची सूची:
राज्यात अधिकृतपणे बदलण्यात आलेली नावे खालीलप्रमाणे आहेत:
जुने नाव. नवीन अधिकृत नाव
औरंगाबाद – छत्रपती संभाजीनगर
अहमदनगर – अहिल्यानगर
उस्मानाबाद – धाराशिव
इस्लामपूर – ईश्वरपूर
वेल्हे – राजगड
‘हा तर शासकीय निर्णयाचा अवमान’ – समितीची भूमिका
हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी सांगितले की, “राज्य शासनाने रीतसर शासन निर्णय व राजपत्र प्रसिद्ध करून या नवीन नावांना कायदेशीर मान्यता दिली आहे.
त्यामुळे सर्व शासकीय दप्तरी आणि सार्वजनिक फलकांवर नवीन नावांचा वापर करणे प्रशासनाला कायदेशीररित्या बंधनकारक आहे. असे असतानाही जुने फलक तसेच ठेवणे, हा शासकीय निर्णयाचा अवमान असून संबंधित अधिकाऱ्यांची ही थेट ‘कर्तव्यकसुरी’ आहे.”
हा विषय केवळ एका जिल्ह्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांनी जुने फलक हटवून नवीन नावे अद्ययावत करण्याबाबत तात्काळ परिपत्रक काढावे,
अशी मागणीही समितीने केली आहे. या वेळी निवेदन देताना समितीचे मुंबई येथील सतीश सोनार आणि रवींद्र नलावडे उपस्थित होते.
