सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार यांना ‘नाफा’ मराठी चित्रपट महोत्सवाचे विशेष आमंत्रण
मराठी चित्रपटांना हॉलिवूडच्या ग्लॅमरमध्ये सन्मानाने मांडणाऱ्या ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ (NAFA) तर्फे आयोजित दुसऱ्या भव्य मराठी चित्रपट महोत्सवाला सॅनहोजे, कॅलिफोर्निया येथे २५ ते २७ जुलै २०२५ दरम्यान रंगतदार सुरुवात होणार आहे. प्रतिष्ठित कॅलिफोर्निया थिएटर येथे होणाऱ्या या महोत्सवासाठी यंदा महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार यांना विशेष आमंत्रण देण्यात आले आहे.
या महोत्सवाची संकल्पना आणि आयोजन सुवर्ण कमळ पुरस्कार विजेते अभिजीत घोलप यांनी केली असून गेल्यावर्षीपासून ‘नाफा’ या नावाने हा सांस्कृतिक उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यावर्षी महोत्सव अधिक भव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरणार असून, अमेरिकेतील मराठी रसिकांसाठी हे एक सांस्कृतिक पर्व ठरणार आहे.
अभिजीत घोलप यांनी अलीकडेच महाराष्ट्रात येऊन अॅड. शेलार यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि महोत्सवाचे आमंत्रण दिले. शेलार यांनी त्यास तत्काळ होकार देत आपल्या उपस्थितीची खात्री दिली आहे. यासोबतच सॅनहोजे शहराचे महापौर मा. मॅट महन यांनाही आमंत्रण देण्यात आले असून, त्यांनी देखील या सोहळ्यास उपस्थित राहण्याची तयारी दर्शविली आहे.

या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमुळे महोत्सवाच्या अवार्ड नाईट ला विशेष महत्त्व प्राप्त होणार असून, प्रथमच सांस्कृतिक मंत्री आणि अमेरिकन महापौर एकत्र मंचावर येत असल्याची माहिती घोलप यांनी दिली.
‘नाफा’ हा उत्तर अमेरिकेतील मराठी चित्रपटसृष्टीला व्यासपीठ मिळवून देणारा एकमेव संस्थात्मक प्रयत्न असून, मराठी सिनेमांना हॉलिवूडसदृश दर्जा, व्यावसायिक संधी आणि आंतरराष्ट्रीय गौरव मिळवून देण्याच्या दिशेने कार्यरत आहे.
