Wednesday, June 17, 2026
Latest:
धर्म संस्कृती

पंढरपूर: विठ्ठल मूर्तीला हानी पोहोचल्यास मंदिर समिती आणि पुरातत्त्व विभागावर फौजदारी खटला भरणार

मंदिर महासंघ व वारकरी संघटनांचा कडक इशारा!

पंढरपूर:

पंढरपूर येथील कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर पुरातत्त्व विभागाद्वारे २३ आणि २४ जून रोजी नियोजित असलेल्या रासायनिक वज्रलेपन प्रक्रियेला (Epoxy/Silicon) वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने कडाडून विरोध केला आहे. “जर या प्रक्रियेत विठ्ठल किंवा रुक्मिणीमातेच्या मूर्तीला कोणतीही हानी पोहोचली, तर संबंधित अधिकारी आणि मंदिर समितीवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करू”, असा इशारा महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत दिला आहे. या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व मंदिरे समिती यांना सादर करण्यात आले आहे.

प्रशासनाच्या दाव्यांवर वारकरी संघटनांचे गंभीर प्रश्न:

पत्रकार परिषदेत वारकरी पाईक संघाचे ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर आणि अन्य मान्यवरांनी प्रशासकीय कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला:

अवघ्या ४-५ वर्षांतच लेपन खराब कसे झाले?: कोरोना काळात केलेले लेपन पुढील १० वर्षे टिकेल, असा दावा प्रशासनाने केला होता. मग अवघ्या ४-५ वर्षांतच मूर्तीला पुन्हा लेपनाची आवश्यकता का भासली? हे या रासायनिक प्रक्रियेचे अपयश नाही का?

पायाला खड्डे कसे पडले?: तब्बल २८ युगे विटेवर सुखरूप उभा असणार्‍या पांडुरंगाच्या मूर्तीच्या पायाला कोरोना टाळेबंदीच्या काळात खड्डा कसा पडला आणि श्री रुक्मिणीमातेचे पाय का खराब झाले, याचे कोणतेही शास्त्रीय उत्तर अद्याप मंदिर समिती किंवा पुरातत्त्व विभागाला देता आलेले नाही.

मूर्ती ठिसूळ होण्याचा धोका: कृत्रिम रसायनांमुळे पाषाणाचे नैसर्गिक श्वसन रोखले जाऊन मूर्ती आतून ठिसूळ होण्याचा गंभीर धोका आहे. वारकरी संत-महंत आणि मूर्तीशास्त्रज्ञांना विश्वासात न घेता प्रशासनाने एकतर्फी पाऊल उचलल्यास संपूर्ण महाराष्ट्रात जनक्षोभ निर्माण होईल.

कोल्हापूरच्या अंबाबाई मूर्तीला ‘सेंद्रीय लेपन’ मग विठ्ठलालाच ‘रासायनिक’ का? षडयंत्राची शंका!

१० वर्षांपूर्वी (२२ जुलै ते ६ ऑगस्ट २०१५) जेव्हा कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीला केंद्रीय पुरातत्व विभागाचे अधिकारी एम्.आर्. सिंह यांनी वज्रलेप केला होता, तेव्हा सेंद्रीय पद्धतीचा वापर केला गेला होता. त्या प्रक्रियेत मूर्तीचा पाषाण, बेहडा, दुर्वांचा अर्क आणि बिब्ब्याचे तेल यांचे मिश्रण वापरले गेले होते.

महासंघाचा सवाल: “जर महालक्ष्मी देवीच्या मूर्तीला अत्यल्प निधीत होणारी सेंद्रीय लेपन प्रक्रिया योग्य होती, तर आता पंढरपुरात खर्चित आणि अशास्त्रीय रासायनिक लेपनाचा अट्टाहास का? पुरातत्व विभागाचे अधिकारी विलास वहाणे यांना यातून काय साध्य करायचे आहे? खर्च पडणाऱ्या अधिक निधीसाठीच तर हे षडयंत्र रचले जात नाही ना?” अशी शंका घेण्यास निश्चित वाव आहे.

सायनिक वज्रलेप केल्यास मूर्तीचा दाह होतो” – करवीर पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य

या संदर्भात करवीर पीठाचे श्री स्वामी जगद्गुरु शंकराचार्य यांनी स्पष्ट मत मांडले आहे की, ‘‘‘यथा देहे तथा देवे’ या उक्तीनुसार रासायनिक वज्रलेप केल्यास ज्या पद्धतीने कोणतेही रसायन आपल्या शरीराचा दाह करते, तसेच त्या मूर्तीचा दाह होतो. त्यामुळे ‘रासायनिक वज्रलेप करू नये’.’’ शंकराचार्यांसारख्या आध्यात्मिक अधिकारी व्यक्तीपेक्षा पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना अधिक कळते का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

थेट फौजदारी कारवाईचा इशारा:

वारकरी पाईक संघाचे ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर म्हणाले की, कोल्हापूरच्या मूर्तीचे रासायनिक प्रक्रियेमुळे झालेले नुकसान आपल्या डोळ्यांसमोर आहे. कोणत्याही शास्त्रीय प्रक्रियेपूर्वी याचे दिवाणी व फौजदारी उत्तरदायित्व (Legal Liability) निश्चित होणे आवश्यक आहे. मूर्तीला हानी पोहोचल्यास धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आणि राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी वारकरी व हिंदु संघटना कोर्टात धाव घेतील.

या पत्रकार परिषदेला ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर. प्रसाद पंडित (धर्माधिकारी, अक्कलकोट), चंद्रकांत रमणशेट्टी (हिंदुराष्ट्र समन्वय समिती), विनोद रसाळ (महाराष्ट्र मंदिर महासंघ) आणि राजन बुणगे (हिंदु जनजागृती समिती) उपस्थित होते.