सहकार भारतीचे अ. भा. संघटन मंत्री संजय पाचपोर यांचा वाढदिवस: साडेतीन दशकां पासून सुरू असलेला अखंड राष्ट्रकार्याचा प्रेरणादायी प्रवास…!
मुंबई:
भारत मातेच्या उत्थानाकरता राष्ट्रकार्याला आयुष्य अर्पण करणारे, शिस्त आणि आपुलकीचा संगम असलेले व्यक्तिमत्त्व, सहकार भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री मा. श्री. संजयजी पाचपोर यांचा दि.१६ जुन रोजीचा वाढदिवस उत्साहात परंतु साधेपणाने साजरा करण्यात आला. सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश संघटनप्रमुख शरद जाधव यांनी संजयजींच्या ३५ वर्षांहून अधिक काळाच्या अखंड प्रवासाला आणि संघटनात्मक कार्याला एका विशेष लेखाद्वारे उजाळा देत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
संघर्षातून राष्ट्रकार्याकडे प्रवास
परभणी (मराठवाडा) येथील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या संजयजींचे बालपण संघर्षमय होते. लहान वयातच पितृछत्र अचानक हरपल्यानंतर डगमगून न जाता आलेल्या प्रसंगाला खंबीरपणे तोंड दिले.
त्यांच्या धीरोत्तर मातोश्रींनी त्याही बिकट परिस्थितीत
त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी (अभाविप) आलेल्या संपर्कातून त्यांच्या राष्ट्रकार्याची दिशा निश्चित झाली. शिक्षण पूर्ण होताच, १९९३ मध्ये त्यांनी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून स्वतःला झोकून दिले.
कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे नाते आणि संकटकाळात धावून जाण्याची वृत्ती वेळोवेळी अनेकांनी अनुभवली आहे.
अभाविपमध्ये काम करत असताना त्यांनी धाराशिव, जळगाव, गोवा, विदर्भ, गुजरात आणि राजस्थान अशा विविध प्रांतांत कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण केले.
सहजता, स्वाभाविकता, ठासून भरलेले संजयजींचे व्यक्तिमत्व म्हणजे एक अजबच रसायन आहे…
अनेक वैशिष्ट्ये असलेला पण तरीही हाडाचा कार्यकर्ता असलेला हा माणूस म्हणजे केवळ विद्यार्थ्यांपुरता संपर्क मर्यादित न राहता त्यांनी कार्यकर्त्यांच्या कुटुंबांशीही जिव्हाळ्याचे संबंध जोडले. किल्लारी भूकंप असो वा कोविडचा कठीण काळ, संकटग्रस्तांना स्वावलंबनाकडे नेण्यात आणि बाधित कार्यकर्त्यांच्या कुटुंबांना आर्थिक व सामाजिक आधार देण्यात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. अभाविपचे मार्गदर्शक स्वर्गीय यशवंतराव केळकर यांच्या कार्यपद्धतीचा संजयजींवर मोठा प्रभाव असून, त्यांचीच परंपरा संजयजी पुढे चालवत आहेत
सहकार क्षेत्राचा देशव्यापी विस्तार
२०१७ मध्ये संजयजींनी सहकार भारतीच्या अखिल भारतीय संघटन मंत्रिपदाची धुरा सांभाळली. सहकार ही केवळ बँका किंवा साखर कारखान्यांपुरती मर्यादित संकल्पना नसून शिक्षण, आरोग्य, शेती, माहिती तंत्रज्ञान आणि उत्पादन अशा विविध क्षेत्रांत तिचा विस्तार व्हावा, या विचाराने त्यांनी काम केले. आज त्यांच्या अथक परिश्रमांमुळे देशातील सुमारे ६०० जिल्ह्यांमध्ये आणि जवळपास सर्वच राज्यांमध्ये सहकार भारतीचे संघटन भक्कमपणे उभे राहिले आहे. वर्षभरात ३६५ दिवस प्रवास करून समाजपरिवर्तनासाठी कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्याचे काम ते अविरत करत आहेत.
अभ्यासू विचारवंत आणि प्रेरणादायी जीवनशैली
संजयजी हे केवळ उत्कृष्ट संघटक नसून एक अभ्यासू विचारवंतही आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित त्यांच्या “डॉ. बाबासाहेब आंबेडकर उवाच” या पुस्तकाच्या मराठी आणि हिंदी आवृत्त्यांच्या ५० हजारांहून अधिक प्रती वाचकांपर्यंत पोहोचल्या आहेत. सामाजिक समरसता हा त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय आहे. नियमित व्यायाम, साधेपणा आणि शिस्तबद्ध दिनचर्या ही त्यांच्या कार्यक्षमतेची ताकद आहे.
त्यांच्या या प्रदीर्घ आणि समर्पित राष्ट्रसेवे बद्दल लिहावे तेवढे कमीच आहे…
त्यांना निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करत संपूर्ण सहकार भारती परिवाराकडून त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
