Wednesday, June 17, 2026
Latest:
मनोरंजन

सॅन होजेत मराठी संस्कृतीचा जागतिक जल्लोष! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘NAFA 2026’ फिल्म फेस्टिव्हलला उपस्थित राहणार

मुंबई, १६ जून (प्रतिनिधी) :

उत्तर अमेरिकेतील मराठी आणि भारतीय समुदायासाठी प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म फेस्टिव्हल २०२६’ (NAFA Film Festival 2026) यंदा ७ ते ९ ऑगस्ट दरम्यान कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे अत्यंत भव्य स्वरूपात पार पडणार आहे. या जागतिक मराठी सांस्कृतिक सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

‘नाफा’ (NAFA) चे संस्थापक अध्यक्ष, प्रख्यात उद्योगपती आणि राष्ट्रीय सुवर्ण कमळ पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते अभिजित घोलप यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना या आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे अधिकृत निमंत्रण दिले. मुख्यमंत्र्यांनी हे निमंत्रण अत्यंत आनंदाने स्वीकारत महोत्सवाला उपस्थित राहण्याची ग्वाही दिली आणि या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक, अभिजित घोलप आणि डॉ. गौरी घोलप उपस्थित होत्या.

हॉलिवूडच्या झगमगाटात रंगणार ‘नाफा २०२६’! सॅनहोजेमध्ये ७ ते ९ ऑगस्टदरम्यान तिसरा मराठी चित्रपट महोत्सव

NAFA Stream OTT’ मुळे मराठी सिनेमाला जागतिक बाजारपेठ: मुख्यमंत्री

या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी ‘नाफा’च्या विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आणि विशेषतः ‘NAFA Stream OTT’ या प्लॅटफॉर्मचे भरभरून कौतुक केले.

परदेशात राहणाऱ्या मराठी बांधवांसाठी असे दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध होणे ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. NAFA Stream OTT मुळे महाराष्ट्रातील चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या कलाकृती थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर करण्याची मोठी संधी मिळेल. यामुळे मराठी चित्रपटसृष्टीचा जागतिक प्रेक्षकवर्ग अधिक व्यापक होण्यास नक्कीच मदत होईल.”

— देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र

दिग्गजांची मांदियाळी आणि रेड कार्पेट सज्ज

उत्तर अमेरिकेत भारतीय संस्कृती आणि मराठी अस्मिता टिकवून ठेवणारा हा महोत्सव यंदाचा तिसरा चित्रपट महोत्सव आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज यात सहभागी होणार आहेत. यावर्षी ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे, महेश मांजरेकर, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे, सुप्रसिद्ध गीतकार गुरू ठाकूर, अभिनेत्री श्रुती मराठे आणि गिरिजा ओक यांच्यासह अनेक नामवंत कलाकार या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असतील. गेल्या वर्षी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी या महोत्सवाला हजेरी लावली होती.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे महोत्सवाचे वैभव वाढेल: अभिजित घोलप

या प्रसंगी बोलताना ‘नाफा’चे संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप म्हणाले, “NAFA फिल्म फेस्टिव्हल हा केवळ चित्रपटांचा महोत्सव राहिलेला नसून तो भारतीय संस्कृती, मराठी अस्मिता आणि जागतिक स्तरावरील कलावंतांना जोडणारा एक सशक्त सांस्कृतिक मंच बनला आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या निमंत्रणाचा सन्मान करून उपस्थित राहण्याची सकारात्मक भूमिका दर्शवली, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. उत्तर अमेरिकेतील हजारो मराठी आणि भारतीय रसिक त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक असून, त्यांच्या उपस्थितीमुळे या महोत्सवाचे वैभव निश्चितच अधिक उंचावेल.”

यंदाचा ‘नाफा २०२६’ हा चित्रपट महोत्सव कलात्मक देवाणघेवाण आणि जागतिक मराठी ऐक्याचा एक भव्य आणि ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे.