परळी वैजनाथ, घृष्णेश्वर, सप्तशृंगी तीर्थक्षेत्रांच्या ५३१ कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून तीर्थक्षेत्र विकासाचा आढावा
मुंबई, दि. ९
राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची आज बैठक झाली. या बैठकीत श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योर्तिलिंग विकासाच्या २८६.६८ कोटी रुपयांच्या सुधारित विकास आराखड्यास,श्री क्षेत्र घृष्णेश्वर तीर्थक्षेत्राच्या सुधारित १६३ कोटी आणि श्री क्षेत्र सप्तशृंगी देवी या तीर्थक्षेत्राच्या ८१.८६ कोटीच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली.
मंत्रालयात झालेल्या शिखर समितीच्या या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, मुख्य सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. गोविंदराज, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते.
श्री क्षेत्र परळी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार करण्यात येणाऱ्या कामांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. मंदिराच्या मागील बाजूच्या जागेवर लाईट आणि साऊंड शो करण्यात येणार आहे. श्री क्षेत्र घृष्णेश्वर विकास आराखड्यामध्ये वळण रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. लेणी क्रमांक एक ते महादेव मंदिर हा नवीन रस्ता १.६५० किमीमी लांबीचा असून त्यासाठी २७.५८ कोटी खर्च अपेक्षित आहे. श्री सप्तशृंगी देवी विकास आराखड्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी या तीर्थक्षेत्र विकासासाठी ८१.८६ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला.
——–