पाकिस्तान, चीनसह भारतात असणार्या अंतर्गत शत्रूंचाही विचार करावा लागेल – संरक्षणतज्ञ, कर्नल आर.एस्.एन्. सिंह यांचे प्रतिपादन
मुंबई, दि. ९
अंतर्गत शत्रूंमुळे अनेक देशांची हानी झाली आहे. विविध युद्धसाहित्य असतांनाही अंतर्गत शत्रू आणि सांस्कृतिक भिन्नतेमुळे ‘सोव्हिएत युनियन’चे अनेक देश होताना आपण पाहिले. त्यामुळे पाकिस्तान आणि चीन या दोन शत्रूंसह भारतात असणार्या अंतर्गत शत्रूंचाही आपल्याला विचार करावा लागेल, असे प्रतिपादन दिल्ली येथील संरक्षणतज्ञ आणि ‘भारत के अंदरूनी शत्रु’ या पुस्तकाचे लेखक सेवानिवृत्त कर्नल आर.एस्.एन्. सिंह यांनी केले.
हिंदू जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘भारताचे अंतर्गत शत्रू कोण ?’ या विषयावरील विशेष संवादात ते बोलत होते. हिंदू जनजागृती समितीचे दिल्ली प्रवक्ते नरेंद्र सुर्वे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
भारताचे विविध शत्रू देशावर आघात करत असून भारताच्या विरोधात ‘प्रॉक्सी वॉर’ चालू आहे, ज्यात काही देशविरोधी राजकीय पक्ष, शिक्षणसंस्था, वकील, पत्रकार यांचा समूह कार्यरत आहे. कोणताही देश बाहेरील शत्रूंमुळे नव्हे, तर अंतर्गत शत्रूंमुळे कोसळतो, असेही सिंह म्हणाले.
आमची लढाई केवळ पाकिस्तानशी नसून तेथे उत्पन्न झालेल्या ‘जिहाद’शी आहे. या जिहादला पाठिंबा देणारे आणि मदत करणारे लोक, ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’, त्यांचे माओवादी, तसेच ज्यांचे येथील चर्चशी सलोख्याचे संबंध आहेत, अशांसह अनेक भारतविरोधी घटकांशी आपल्याला लढावे लागत आहेत. हिंदूंनी स्वतःविषयी अभिमान बाळगून आत्मविश्वासाने पुढे जायला हवे, असे आवाहनही कर्नल सिंह यांनी केले.
—–