भाजप मनसेचे बिनसले की फडणविशी ‘राज’कीय नाटक
शेखर जोशी
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजप आणि मनसे यांचे बिनसले की हे फडणविशी ‘राज’कीय नाटक आहे? मनसेने ही कोलांटीउडी का मारली? अशी चर्चा रंगली आहे. भाजप नेते आणि मुंबई भाजप अध्यक्ष ॲड. आशिष शेलार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील रंगलेला कलगीतुराही यानिमित्ताने पाहायला मिळाला. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी कॉंग्रेसचे अभिनंदन केले. कर्नाटकच्या विजयासाठी काँग्रेसचे अभिनंदन आणि जनमताचा कौल झुगारून घोडेबाजार करणाऱ्यांसाठी बोध, अशी टिप्पणी किल्लेदार यांनी केली. हे पत्र किल्लेदार यांनी आपल्या मनाने नक्कीच लिहिले नसणार.
राज ठाकरे यांनीच त्यांना तसे लिहायला आणि समाज माध्यमांतून ते पत्र पसरवायला भाग पाडले असणार. त्यानंतर जनतेला गृहित धरले की काय होते? आमचे कोणीही काहीही बिघडवू शकत नाही, असे मानणाऱ्यांसाठी कर्नाटकाचा निकाल आणि पराभव महत्त्वाचा आहे, असे स्वतः राज ठाकरे यांनी सांगितले. भाजप आणि मनसे यांची जवळीक गेल्या काही दिवसांपासून वाढली होती. अगदी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते अन्य नेते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन गप्पागोष्टी करत होते. मग कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजप आणि मनसेमध्ये दुरावा निर्माण व्हायला नेमके काय झाले? मुळात मनसे स्थापनेचा वेळी पक्षाच्या झेंड्याच्या रंगावरून पक्षाची भूमिका काय? हे कळून चुकले होते. ती सर्वसमावेशक भूमिका मनसेने बदलली.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देशभरातील शाखांमध्ये सायबर फसवणुकीच्या प्रकारांत वाढ
अगदी सुरुवातीला राज ठाकरे यांनी ते पंतप्रधान नसताना नरेंद्र मोदी यांचे गोडवे गायले. मोदी पंतप्रधान झाल्यावर राज ठाकरे यांनी चुकीच्या माणसाच्या हातात देश गेला, अशी भूमिका घेतली. मग शरद पवार आणि राज ठाकरे यांचे सूत जुळले. लाव रे तो व्हिडिओ म्हणत मोदी, शहा, फडणवीस यांच्यावर तोंडसुख घेतले. एवढे करूनही शरद पवार यांनी मनसेला महाविकास आघाडीत घेतले नाही. नंतर शरद पवार हे राज ठाकरे यांना जातीयवादी वाटायला लागले आणि त्यांनी पवारांचा हात सोडला. अडखळणा-या आणि नेमके काय केले म्हणजे मनसेची हवा निर्माण होईल यात चाचपडणा-या मनसेने मशिदींवरील भोंगे हटाव हा विषय जोरदार वाजविला. राज ठाकरे यांनी पुन्हा हिंदुत्ववादी भूमिका घेतली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव अवघ्या ७ तासांत – वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी यशस्वी
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सोडलेले हिंदुत्व, त्यांची मते मनसेला मिळावित, अशी भूमिका त्यामागे असू शकते. आणि ती चुकीची नाही. पण कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर मनसेची भाषा बदलली हे उघडच आहे. मोदी यांची जादू संपली आता महाराष्ट्रातही भाजप आपटणार असे मानून सर्व जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत, त्यात मनसेही सहभागी झाली आहे की यामागे काही वेगळे ‘राज’कारण आहे? भाजप आणि शिवसेनेला पर्याय म्हणून मतदार मनसेकडे पाहात होते. पण अशा राजकीय कोलांट्याउड्या मारुन मनसे मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनातही संभ्रम निर्माण करत आहे. त्याचा राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विधानसभा निवडणुकीत फायदा की तोटा होईल हे येणारा काळच ठरवेल.