बिहारमध्ये भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे महानायक: विनोद तावडे यांची ‘चाणक्य’ नीती यशस्वी!
पाटणा/मुंबई: बिहारच्या राजकीय क्षितिजावर आज (१५ एप्रिल २०२६) एक नवा सूर्योदय होत आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री म्हणून सम्राट चौधरी शपथ घेत आहेत. भाजपच्या या ऐतिहासिक यशामागे आणि ‘छोट्या भावा’ची भूमिका सोडून ‘मोठा भाऊ’ म्हणून प्रस्थापित होण्यामागे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार विनोद तावडे यांची चतुरस्त्र रणनीती आणि निष्ठेचे बळ कारणीभूत ठरले आहे.
संकटातून सत्तेकडे: तावडेंचा ‘मिशन मोड’
सप्टेंबर २०२२ मध्ये जेव्हा विनोद तावडे यांनी बिहारचे प्रभारी म्हणून सूत्रे हाती घेतली, तेव्हा भाजप बिहारमध्ये सत्तेपासून दूर होता. मात्र, तावडेंनी अत्यंत संयमाने आणि पडद्यामागून हालचाली करत जानेवारी २०२४ मध्ये नितीश कुमार यांना पुन्हा महायुतीमध्ये आणण्यात यश मिळवले. ही त्यांच्या राजकीय शिष्टाईची पहिली मोठी विजयाची पाऊलखूण होती.
केरळ विधानसभा निवडणूक : विनोद तावडे यांच्यावर ‘लेफ्ट किल्ला’ भेदण्याची जबाबदारी
२०२५ च्या निवडणुकीचे ‘मास्टरमाईंड’
२०२५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान मिळवला, याचे संपूर्ण श्रेय तावडे यांच्या सूक्ष्म नियोजनाला जाते. त्यांनी केवळ निवडणुकीचे व्यवस्थापन केले नाही, तर खालील आव्हाने यशस्वीपणे पेलली:
जातीपातीच्या राजकारणाला ‘विकासाची’ जोड:
बिहारच्या पारंपरिक जातीय राजकारणाला छेद देत तावडेंनी “जातीच्या पलीकडे विकास” ही संकल्पना तळागाळापर्यंत पोहोचवली. यामुळे अतिमागास आणि तरुण मतदारांनी मोठ्या प्रमाणावर भाजपला कौल दिला.
प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज्य’ला रोखले:
निवडणुकीत प्रशांत किशोर यांचे आव्हान मोठे वाटत असताना, तावडेंनी आपल्या रणनीतीने त्यांचा प्रभाव मर्यादित ठेवला आणि मतदारांचा कल विकासाच्या मुद्द्याकडे वळवला.
बूथ स्तरावर कार्यकर्त्यांचे जाळे: अभाविपमधील आपल्या दांडग्या अनुभवाचा वापर करत त्यांनी बिहारमधील प्रत्येक बूथवर कार्यकर्त्यांची फळी मजबूत केली.
विनोद तावडे: भाजपचा नवा ट्रम्प कार्ड: मिशन यूपी 2027
नेतृत्व बदलाचा सुवर्णमध्य
नितीश कुमार यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्भवलेला पेच तावडेंनी अतिशय संयमाने हाताळला. मित्रपक्षांना (JD-U) विश्वासात घेऊन सम्राट चौधरी यांच्या नावावर सर्वांचे एकमत घडवून आणणे, ही तावडेंची मोठी संघटनात्मक कामगिरी मानली जात आहे.
निष्ठेचे फळ आणि ‘मूळ’ भाजपची ताकद
आजच्या राजकारणात अनेक नेते केवळ ‘शांत झोप’ मिळावी म्हणून भाजपमध्ये येत असताना, विनोद तावडे यांनी मात्र पक्षाने तिकीट नाकारले असतानाही डगमगून न जाता स्वतःला झोकून दिले. “पक्षासाठी आणि इतर नेत्यांना मोठे करण्यासाठी काम करणे” हे केवळ मूळ आणि निष्ठावंत भाजप कार्यकर्ताच करू जाणे, हे तावडेंनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले आहे.
ज्या राज्यात भाजप अनेक दशके केवळ सहकारी पक्षाच्या सावलीत वाढला, तिथे आज तावडेंच्या राजकीय व्यूहरचनेमुळे भाजपचा स्वतःचा मुख्यमंत्री विराजमान झाला आहे. म्हणूनच राजकीय वर्तुळात विनोद तावडे यांना बिहारचे ‘आधुनिक चाणक्य’ म्हणून ओळखले जात आहे.
