विशेष परिसंवाद: ‘सीजेपी’ आंदोलनाच्या आडून डाव्यांचा अर्बन नक्षलवाद उधळून लावा – ॲड. सत्येंद्र मुळे
पुणे:
“लोकशाहीची मूळ संकल्पना हिंदु धर्मानेच जगाला दिली आहे. भारत हा मुक्त विचारांचा देश असतानाही डावी विचारधारा देशाच्या प्रगतीत सातत्याने अडथळे आणत आहे. ‘अवॉर्ड वापसी गँग’, ‘नर्मदा बचाव आंदोलन’ आणि ‘शेतकरी आंदोलनां’च्या आडून न्यायव्यवस्था, सैन्य, प्रसारमाध्यमे आणि शिक्षण व्यवस्था या लोकशाहीच्या मुख्य स्तंभांवर जाणीवपूर्वक आक्रमणे केली जात आहेत. हे धोकादायक षड्यंत्र उधळून लावण्यासाठी युवा पिढीला खऱ्या इतिहासाची जाणीव करून देणे आणि वैचारिक पातळीवर सक्षम करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट सत्येंद्र मुळे यांनी केले.
सनातन संस्थेच्या वतीने २० ऑगस्ट रोजी पुणे येथील माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयातील गणेश सभागृहात ‘सीजेपी आंदोलनात अर्बन नक्षलवाद?’ या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला ३०० हून अधिक नागरिक उपस्थित होते. सामाजिक व राजकीय विश्लेषक श्री. सर्वेश मेहंदळे यांनी वक्त्यांशी संवाद साधत अर्बन नक्षलवादाची विविध अंगे उलगडून दाखवली.

‘दिमागी नक्षलवाद’ हा भारताला झालेला वैचारिक कर्करोग
सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी पंतप्रधानांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाचा संदर्भ देत सांगितले, “पंतप्रधानांनी ‘दिमागी नक्षलवादापासून सावध राहा’ असा इशारा देऊन देशाला अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला आहे. साम्यवाद आणि अर्बन नक्षलवाद हा भारतीयत्वाला झालेला मानसिक कर्करोग असून, हा आजार दूर करण्यासाठी वैचारिक व बौद्धिक पातळीवर शस्त्रकर्म करावे लागेल. ‘जेन-जी’ (Gen-Z) पिढीसमोर साम्यवाद्यांचा खरा चेहरा आणून दाखवणे आणि समाजवाद्यांचा दुटप्पीपणा उघड करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.”
हिंदू दहशतवाद नावाचे थोतांड’ पुस्तकाचे ठाण्यात प्रकाशन; २३ ऑगस्टला रंगणार विशेष मुलाखत
‘सीजेपी’ आंदोलनामागे परकीय निधी आणि डाव्या संघटनांचा हात
सामाजिक व राजकीय विश्लेषक श्री. सर्वेश मेहंदळे यांनी आंदोलनातील तथ्य मांडताना सांगितले, “सोनम वांगचूक यांच्या नावावर ३०० नव्हे, तर केवळ एकच पेटंट आहे; तसेच त्यांच्या ‘सेकमोल’ या संस्थेचा ‘एफसीआरए’ (FCRA) परवाना सरकारने रद्द केला आहे. सीजेपी आंदोलनाला ‘आयसा’ (AISA), ‘एसएफआय’ (SFI) आणि काही ख्रिश्चन मिशनरी संघटनांनी पाठिंबा दिला असून परकीय निधीविषयक कायद्यातील कडक बदलांना विरोध करणे हाच या आंदोलनामागील मुख्य उद्देश होता.”
१४ हजाराहून अधिक निरपराधांच्या हत्यांवर पुरोगामी मौन का?
हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी व्हिडियो संदेशाद्वारे आपली भूमिका मांडली. “गांधी हत्येनंतर देशात केवळ चार पुरोगाम्यांच्या हत्या झाल्याचा आभास निर्माण केला जातो; परंतु नक्षलवाद्यांनी मारलेल्या १४ हजाराहून अधिक निरपराधांच्या हत्यांवर हे अर्बन नक्षलवादी पूर्णपणे मौन बाळगतात. हे षड्यंत्र उधळण्यासाठी सर्वांनी कृतीशील झाले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.

