ठाण्यात प्रा. यशवंतराव केळकर यांच्या दैनंदिनीवर आधारित ‘बिंब बचकेएवढे’ पुस्तकाचे प्रकाशन
ठाणे, दी. 19 मे: “ध्येयनिष्ठ जीवनदृष्टी, विशुद्ध जीवनव्यवहार आणि स्वयंशासनपूर्ण संघटनदृष्टीचा उच्च आदर्श प्रा. यशवंतराव केळकर यांनी आपल्या जीवनातून उभा केला.

त्यांनी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून हजारो तरुण-तरुणींना देशकार्यासाठी आणि शुद्ध जीवन जगण्यासाठी प्रेरित केले,” असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि अभाविपचे माजी राष्ट्रीय महामंत्री रविकुमार अय्यर यांनी काढले.

अभाविपच्या माध्यमातून सामाजिक संघटनांच्या कार्यपद्धतीला नवा आकार देणारे प्रा. यशवंतराव केळकर यांच्या दैनंदिनीवर आधारित *बिंब बचकेएवढे* या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते.

प्रा. यशवंतराव केळकर यांनी लिहिलेल्या दैनंदिनीचे संपादित पुस्तक “बिंब बचकेएवढे” याचे प्रकाशन कार्यक्रमत ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर आणि प्रा. जयंत कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या या पुस्तकातील विचार आपल्या सर्वांना राष्ट्रकार्यासाठी अविरत काम करण्याची ऊर्जा देतील आणि हे पुस्तक कार्यकर्त्यांसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल असे उदगार या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून उपस्थित भाजपा राष्ट्रीय महासचिव, खासदार विनोद तावडे यांनी व्यक्त केली.

डॉ. जयंत कुळकर्णी आणि अरुण करमरकर यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात कार्यक्रम झाला.

प्रिय यशवंतराव’ लघुपटाने श्रोते मंत्रमुग्
पुस्तकाच्या प्रकाशनानंतर यशवंतरावांच्या जीवन आणि कर्तृत्वावर आधारित **प्रिय यशवंतराव’* हा विशेष दृकश्राव्य (लघुपट) कार्यक्रम सादर करण्यात आला. सुमारे एक तासाच्या या प्रभावी कार्यक्रमाची निर्मिती प्रसिद्ध माध्यम कलाकार मिलिंद भणगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. हा कार्यक्रम खुर्चीला खिळवून ठेवणारा आणि थेट काळजाला भिडणारा होता, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला ग्रंथालय प्रकाशनाचे दिनकर गांगल, ‘भारतीय स्त्री शक्ती’ संस्थेच्या संस्थापिका निर्मला आपटे, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख, आमदार निरंजन डावखरे, लेखक दीपक करंजीकर, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘सृजन संपदा फाउंडेशन’च्या अध्यक्षा नयना सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन केले. शेवटी अभाविप ठाणे शाखेचे अध्यक्ष प्रा. भूषण ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानले.
प्रा. यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘बिंब बचकेएवढे’ पुस्तकाचे प्रकाशन
