बहिणाबाईंच्या कवितांनी आणि घोषणांनी दुमदुमले उद्यान – कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या स्मृतिदिनाला डोंबिवलीत मोठी उपस्थिती
डोंबिवली (पूर्व): ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी अमर रहें!’, ‘बहिणाबाईंची लेखणी – महाराष्ट्राची शान!’, ‘ग्रामीण संस्कृतीची अभिमान, कवयित्री बहिणाबाई महान!’ या घोषणांनी आणि बहिणाबाईंच्या कवितांच्या ओळींनी आज डोंबिवली पूर्व येथील सुनील नगरमधील कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानाचा परिसर दुमदुमला होता. निमित्त होते थोर कवयित्री बहिणाबाई नथुजी चौधरी यांच्या ७५ व्या स्मृतिदिनाचे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मालकीच्या या उद्यानात बुधवार, दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी बहिणाबाईंचा स्मृतिदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

ज्येष्ठ नागरिक आणि हास्य कवयित्रींचा सहभाग
उद्यानात नियमित व्यायामासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक श्रीमती सरोजिनीताई पाटील यांच्या शुभहस्ते कवयित्री बहिणाबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समितीच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे सदस्य श्री कृष्णा मारुती सोमार्डे सर यांनी केले. या स्मृतिदिनानिमित्त डोंबिवलीकर रहिवासी व हास्य कवयित्री माननीय सौ. लताताई पाटील यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी बहिणाबाईंच्या जीवनातील अनेक संस्मरणीय प्रसंग कथन केले, तसेच बहिणाबाईंच्या लोकप्रिय कविता सादर करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

विशेष व्यक्तींचा सन्मान
यावेळी सेवाभावी वृत्ती आणि योगदानाबद्दल काही विशेष व्यक्तींचा सन्मान करण्यात आला:
कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समितीमधील महिला वर्गाच्या वतीने लताताई पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून उद्यानामधील प्लास्टिक कचरा नित्य नियमाने उचलणारे श्री केशव करकेरा यांचा समितीचे सदस्य श्री कोटियन (दिव्यांग बांधव) यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

उद्यानातील सर्वात ज्येष्ठ असलेल्या श्रीमती सरोजिनीताई पाटील यांचाही समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
माजी नगरसेवक आणि सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाचे श्री. प्रकाश माने यांनी कार्यक्रमाचे सुव्यवस्थित सूत्रसंचालन केले.
लोकसहभागातून समितीचा उपक्रम
सदर उद्यानात दररोज सकाळी ते संध्याकाळपर्यंत परिसरातील शेकडो नागरिक व्यायाम, चालणे व खेळण्यासाठी येत असतात. नियमित व्यायाम करणाऱ्या या नागरिकांनी एकत्र येऊन “कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समिती” हा व्हाट्सअप समूह तयार केला आहे. या समितीच्या वतीने बहिणाबाईंचा जन्मदिन, स्मृतिदिन तसेच काही निवडक सण लोकवर्गणीतून साजरे केले जातात.

या अभिवादन कार्यक्रमासाठी प्रदीप पवार, विक्रम म्हात्रे, शरदचंद्र जोशी, हेमंत बारस्कर, सार्थक चव्हाण यांच्यासह व्यायाम समितीचे सुमारे १०० पेक्षा अधिक महिला व पुरुष सदस्य मोठ्या संख्येने उत्साहाने उपस्थित होते.
