सामाजिक

मिशन ‘बाल भरारी’च्या माध्यमातून ग्रामीण शिक्षणाला एआयची साथ – भारतातील पहिली AI-सक्षम अंगणवाडी नागपूर जिल्ह्यात सुरू

नागपूर, 28 जुलै 2025 – महाराष्ट्रातील ग्रामीण शिक्षण प्रणालीला कृत्रिम बुद्धिमत्तेचे (AI) आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारा एक अनोखा उपक्रम — ‘मिशन बाल भरारी’ — आज नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते औपचारिकपणे सुरू करण्यात आला.

या उपक्रमाअंतर्गत भारताची पहिली AI-सक्षम अंगणवाडी नागपूर जिल्ह्यातील वडधामना (ता. हिंगणा) येथे कार्यान्वित करण्यात आली असून, येथील लहानग्यांना आता VR हेडसेट्स, AI-संलग्न स्मार्ट डॅशबोर्ड आणि इंटरॅक्टिव्ह डिजिटल शिक्षण माध्यमांद्वारे कविता, गाणी व शैक्षणिक विषय शिकवले जाणार आहेत.

40 हून अधिक अंगणवाड्यांमध्ये आधुनिक शिक्षण प्रणालीचा विस्तार

महिला व बाल विकास विभाग आणि जिल्हा परिषद, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत लवकरच आणखी 40 AI-सक्षम अंगणवाड्या उभारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

या अभिनव संकल्पनेमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील शिक्षणात असलेली दरी कमी होण्यास मदत होणार असून, प्रत्येक बालकाला जिज्ञासेने, आनंदाने व आत्मविश्वासाने शिकण्याची संधी मिळवून देणे, हा या मिशनचा मुख्य हेतू आहे.

उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमावेळी राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार समीर मेघे तसेच महिला व बाल विकास विभागाचे आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते.

मिशन बाल भरारी – शिक्षणात नवयुगाचा आरंभ

‘मिशन बाल भरारी’मुळे ग्रामीण भागातील मुलांनाही उच्च दर्जाचे, तांत्रिकदृष्ट्या समृद्ध आणि आनंददायी शिक्षण मिळणार आहे. शिक्षण क्षेत्रात डिजिटल परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने हा उपक्रम एक क्रांतिकारी पाऊल मानला जात आहे.