ग्रीन एनर्जी इकोसिस्टीम’कडे निर्णायक वाटचाल — उमरेडमध्ये सौर ऊर्जा आणि हरित हायड्रोजन प्रकल्पांचा शुभारंभ
उमरेड (नागपूर) येथे हरित ऊर्जा क्षेत्रात एक महत्वपूर्ण पाऊल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्ल्डवन एनर्जीज प्रा. लि. च्या अत्याधुनिक सौर पीव्ही निर्मिती सुविधेचे उद्घाटन आज संपन्न झाले. यावेळी 1.2 गिगावॉट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन आणि 2.5 मेगावॉट क्षमतेच्या हरित हायड्रोजन प्रकल्पाचे भूमिपूजनही करण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्प स्थळाची पाहणी करत सविस्तर माहिती घेतली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, वर्ल्डवन एनर्जीज् कंपनीच्या प्रगत तंत्रज्ञानावर आधारित सौर ऊर्जा प्रकल्पात दोन्ही बाजूंनी ऊर्जा निर्माण करणाऱ्या पॅनल्सचा वापर करण्यात आला आहे. यामुळे पारंपरिक सौर पद्धतीच्या तुलनेत सुमारे 25 टक्के अधिक ऊर्जा निर्माण होईल.
यासोबतच हरित हायड्रोजन प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक, स्वच्छ ऊर्जा तयार होणार असून, त्यातून ऊर्जा क्षेत्रात क्रांतिकारी बदल अपेक्षित आहेत. हे दोन्ही प्रकल्प उमरेड परिसरात एक सशक्त, शाश्वत आणि पर्यावरणस्नेही ऊर्जा परिसंस्था उभारतील आणि औद्योगिक वाढीस चालना देतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार परिणय फुके, आमदार किशोर जोरगेवार, आमदार आशिष देशमुख, आमदार बंटी भांगडिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
