Thursday, June 25, 2026
Latest:
Uncategorizedराजकीय

शिवसेना खासदारांची फूट ही अमित शाहांची २०२९ ची तयारी’; राज ठाकरेंच मोठं भाकीत, भाजप-जैन मुनींवरही घणाघात

मुंबई:

“शिवसेना ठाकरे गटाच्या ६ खासदारांची संभाव्य फूट ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची २०२९ च्या निवडणुकांसाठीची पूर्वतयारी आहे,” असे मोठे भाकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. मुंबईतील रंगशारदा सभागृहात आयोजित मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना, शिवसेनेचे ते ६ खासदार भाजपमध्ये न जाता थेट शिंदे गटात का गेले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, भाजपमध्येही सध्या प्रचंड अंतर्गत गोंधळ असून केवळ मोदींमुळे ते शांत आहेत; येत्या वर्षभरात राज्यात किंवा देशातही मोठे बदल होऊ शकतात, असा खळबळजनक दावाही राज ठाकरे यांनी केला.

आमदार-खासदार ५०-१०० कोटींना विकले जात असल्याचा आरोप

मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर तीव्र संताप व्यक्त केला. “राज्यात शेतकरी आणि विद्यार्थी आत्महत्या करत आहेत, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. अशा गंभीर परिस्थितीत नेते मात्र फक्त आमदार आणि खासदार फोडण्यात व्यस्त आहेत.

५० ते १०० कोटी रुपयांना आमदार-खासदार विकले जात आहेत,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला. निवडणुकीच्या तोंडावर लोकांचे मुख्य मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी जाणीवपूर्वक नवनवे वाद उकरून काढले जात असल्याचे त्यांनी म्हटले.

ऑपरेशन टायगर’ ते भाजपमधील आयातांचे राज्य; उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुखाचा मुखवटा बाजूला सारून मांडली शिवसैनिकांची व्यथा!

राज्याची वीज अदानींच्या घशात घालण्याचा डाव?

राज ठाकरे यांनी महावितरणच्या सद्यस्थितीवर एक अत्यंत धक्कादायक दावा केला. भारताच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अहवालानुसार, वीज वितरणात १०० पैकी महाराष्ट्राला केवळ १.५ गुण मिळाले आहेत. महावितरण आता लोकांमधून पैसे उभे करण्यासाठी आपला ‘आयपीओ’ (IPO) आणत आहे.

राज ठाकरे म्हणाले, “ज्या कंपनीला १०० पैकी फक्त दीड मार्क आहे, तिथे सर्वसामान्य माणूस गुंतवणूक कशी करेल? तिथे फक्त अदानीच गुंतवणूक करणार. एकदा का हे अदानींच्या हातात गेले की महाराष्ट्राची वीज आणि उद्या पाणीही तेच ताब्यात घेतील. आपण काय गुलाम आहोत का?” जनतेला केवळ आंदोलनात गुंतवून ठेवून संपूर्ण सिस्टीम ताब्यात घेण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

जैन मुनींच्या राजकीय हस्तक्षेपावर थेट इशारा

महाराजांच्या जिरेटोपावर जैन धर्मीयांचा झेंडा लावण्याच्या प्रकरणावरून राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. “आम्हाला जैन धर्माबद्दल पूर्ण आदर आहे, पण काही जैन मुनी हे चक्क भारतीय जनता पक्षाचे राजकारण करत आहेत,” असा थेट आरोप त्यांनी केला.

पांडे पट्टी सोसायट्यांमध्ये मारता? कधी कबुतरांचा विषय तर कधी पट्ट्यांचा विषय, आम्हाला वाद नको आहेत, पण वाद उकरून काढणार असाल तर आम्ही रस्त्यावर उतरू. मराठी माणसाचे मनगट पाहिलेय का कधी?” असा थेट इशारा त्यांनी दिला.

सोने तस्करी प्रकरणात भाजप नेत्याला अटक; संजय राऊत यांचे रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप

लाडकी बहीण’ सारख्या मोफत योजनांवर खडे बोल

देशात आणि राज्यात वाढत्या आत्महत्यांवर चिंता व्यक्त करताना, सर्वात जास्त २२,१७४ आत्महत्या महाराष्ट्रात झाल्याचे त्यांनी सांगितले. सरकारच्या ‘लाडकी बहीण’ किंवा तत्सम योजनांवर टीका करताना ते म्हणाले, “दर महिन्याला फुकट पैसे देण्यापेक्षा महिलांच्या सक्षमीकरणाकडे जास्त लक्ष द्या.

फुकट कोणतीही गोष्ट दिल्यावर राज्य किंवा देश चालू शकत नाही.” अशा योजनांमुळे राज्याच्या इतर भागांचा निधी ओरबाडला जातो आणि भविष्यातील पिढ्यांचे मोठे नुकसान होते, असे ते म्हणाले.

महाराष्ट्राच्या सत्तेत ‘वर्चस्वा’ची लढाई: मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याचे अर्थ आणि राजकीय समीकरणे

मतदार याद्यांमधील कारस्थान ओळखा!’ – मनसैनिकांना कानमंत्र

राज ठाकरे यांनी मनसैनिकांना निवडणूक प्रक्रियेवर आणि मतदार याद्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे कडक आदेश दिले. ममता बॅनर्जींच्या राज्यात २७ लाख मते गाळली गेल्याचा दाखला देत महाराष्ट्रातही शासकीय यंत्रणा वापरून असेच मोठे कारस्थान सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

“जनगणना अधिकाऱ्यांसोबत भाजपचे लोक फिरतात आणि हा आपला मतदार नाही हे लक्षात आल्यावर त्याची नावे यादीतून वगळली जातात. मनसेने बीएलए (BLA) नेमून भरलेले फॉर्म अधिकाऱ्यांनी रजिस्टर न करता टेबलखाली लपवून ठेवले,” असा दावा त्यांनी केला.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते शेवटी म्हणाले, “तुम्ही उत्तम आंदोलन करता, पण जर मतदारांची नावेच यादीत नसतील, तर त्या निवडणुकांना काही अर्थ उरत नाही. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवायचा असेल, तर हाती सत्ता हवीच आणि सत्तेचा मार्ग मतदार यादीतून जातो.”