Uncategorized

स्टील उत्पादन, हजारो रोजगार आणि कोटी वृक्षांची लागवड – गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा!

गडचिरोली, 23 जुलै 2025 — नक्षलग्रस्त आणि दुर्गम भाग म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता औद्योगिक आणि पर्यावरणीय प्रगतीच्या दिशेने भक्कम पावले टाकत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज गडचिरोली येथे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी संपन्न झाली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना गडचिरोलीच्या सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक बदलाचे भविष्यचित्र मांडले. ग्रीन स्टील क्लस्टर प्रकल्पाच्या माध्यमातून गडचिरोलीत चीनपेक्षा दर्जेदार आणि कमी किमतीचे स्टील उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून तब्बल 20,000 नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून, सध्या 14,000 स्थानिक युवक-युवतींना रोजगार मिळाला आहे.

विशेष उल्लेखनीय म्हणजे, काही महिलांनी हाऊसकीपिंगपासून सुरुवात करून आज वॉल्वो ट्रक ड्रायव्हर म्हणून ₹55,000 प्रती महिना पगार मिळवला आहे. हा सामाजिक परिवर्तनाचा ठोस पुरावा आहे.

राज्यातील पहिली व देशातील चौथी 80 किमी स्लरी पाइपलाइन, ई-व्हेईकल्स आधारित वाहतूक आणि ग्रीन ट्रान्सपोर्ट प्रणालीद्वारे पर्यावरणपूरक उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

गडचिरोलीत पुढील दोन वर्षांत 1 कोटी वृक्षारोपणाचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, त्यातील 40 लाख झाडांची लागवड आजपासून सुरू झाली. स्थानिकांसाठी शाळा, रुग्णालय, कामगारांना भागधारक बनवण्याची योजना, तसेच गोंडवाना व कर्टिन विद्यापीठांच्या सहकार्याने मायनिंग अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला की, “गडचिरोली हा जिल्हा पुढील 5 वर्षांत दरडोई उत्पन्नात राज्यातील टॉप 10 जिल्ह्यांमध्ये स्थान पटकावेल.”

कार्यक्रमाला राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. मिलींद नरोटे, आमदार परिणय फुके, आमदार धर्मरावबाबा आत्राम, पद्मश्री श्रीमती तुलसी मुंडा आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.