रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात दिपेश म्हात्रे? चव्हाण हे म्हात्रे यांना गांभीर्याने घेणार ?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली नसली तरी. मात्र येत्या दोन-तीन महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.
अशा स्थितीत राज्यभरातील सर्वच विधानसभा मतदारसंघात एकप्रकारे लगीन घाई सुरू असून, विविध विधानसभा मतदारसंघातील इच्छुक राजकीय पक्षांच्या नेत्यांची लगबग परिसरात वाढत आहे.
असाच काहीसा प्रकार विधानसभा क्रमांक १४३ डोंबिवली परिसरातही पाहायला मिळत आहे. एकीकडे गेल्या तीन सत्रांपासून येथील आमदार आणि राज्य मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले रवींद्र चव्हाण पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. त्याचवेळी अनेक इच्छुकांनी त्यांच्या विरोधात आपापल्या परीने तयारी सुरू केली आहे.
यंदा शिवसेनेच्या शिंदे गटाचे दीपेश पुंडलिक म्हात्रे हेही डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवू शकतात, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या चर्चांमुळे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या गोटात कमालीची अस्वस्थता पाहायला मिळत आहे.
याचे उदाहरण नुकतेच डोंबिवलीत घडलेल्या एका घटनेवरून समजू शकते. डोंबिवली पश्चिमेतील सम्राट हॉटेल चौकात दीपेश म्हात्रे आयोजित सार्वजनिक गोविंदा उत्सवात म्हात्रे आडनाव असलेले डोंबिवली पश्चिमचे चार दिग्गज नेते एकाच मंचावर एकत्र दिसले.
त्यामध्ये या कार्यक्रमाच्या आयोजक आणि विधानसभा निडणुकीचे इच्छुक उमेदवार दीपेश म्हात्रे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रमेश म्हात्रे, माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि जनार्दन परशुराम म्हात्रे यांचा एकत्रित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
त्याबाबत विविध वृत्तपत्रे आणि टीव्ही चॅनेलमध्ये याविषयी विविध प्रकारच्या बातम्याही आल्या.या सर्व बातम्यांनंतर रवींद्र चव्हाण यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.एव्हढेच नव्हे तर भाजप आमदार चव्हाण यांनी ही घटना गांभीर्याने घेतलीआहे.
या बातम्यांनंतर रवींद्र चव्हाण यांनी भाजपचे माजी नगर सेवक विकास म्हात्रे यांच्या प्रभागात जाऊन स्वच्छता मोहीम राबवली आणि त्यानंतर गणेशोत्सवात शिवसेना नेते जनार्दन म्हात्रे यांच्या घरी जाऊन तेथे दोन तास घालवल्याच्या चर्चाही सोशल मीडियावर पसरल्या होत्या.
या घडामोडी नंतर डोंबिवली पश्चिमेतील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रमेश म्हात्रे यांना विष्णूनगर पोलिसांनी नोटीस बजावल्याच्या बातम्याही गेल्या दोन दिवसांपासून येत आहेत.
शिवसेनेचे डोंबिवली पश्चिमेचे नेते रमेश म्हात्रे यांना पोलिसांनी तडीपारीची नोटीस देण्यात डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांचा हात असल्याचा कोणताही पुरावा कोणाकडे उपलब्ध नाही.
याबाबत विष्णूनगर पोलिस स्टेशन कडून कोणतेही स्पष्टीकरण दिले गेले नाही नाही. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी याबाबत काहीही बोलण्यास तयार नाहीत.
असे असतानाही डोंबिवली विधानसभा ही भारतीय जनता पक्षाच्या मतदारांचा बालेकिल्ला मानली जात असतानाही आमदार रवींद्र चव्हाण हे विरोधी उमेदवार दीपेश म्हात्रे यांची तयारी किती गांभीर्याने घेत आहेत ? याचीच चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.