राजकीय

डोंबिवलीत बांधकाम मंत्री रवींद्र चौहान यांचा वाढदिवसाचे वादग्रस्त होर्डींग्ज

प्रिंटरच्या विरोधात गुन्हा दाखल दाखल

विष्णूनगर पोलिसांकडून चौकस तपास सुरू

डोंबिवली :

डोंबिवलीचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त होर्डींग्जद्वारे त्यांच्या बदनामीसह सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या जॉली प्रिंटरच्या विरोधात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. मंत्री चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या आदल्या रात्री डोंबिवलीत ठिकठिकाणी त्यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे.

हे होर्डींग्ज कुणाच्या चिथावणीवरून छापले आहेत ? याचा चौकस तपास विष्णूनगर पोलिसांनी सुरू केला आहे. तत्पूर्वी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तत्परतेने हे पाचही होर्डींग्ज काढून ताब्यात घेतले आहेत.

शुक्रवारी 20 सप्टेंबर रोजी मंत्री रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस असल्याने कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी शुभेच्छा देणारे बॅनर्स/होर्डिंग्ज उभारले आहेत. मात्र डोंबिवलीच्या पश्चिमेकडील मच्छी मार्केट, रंजीत पॅलेस बार समोर, पूर्वेकडील टिळक चौक, बाजी प्रभू चौक आणि अप्पा दातार चौक अशा 5 ठिकाणी मंत्री चव्हाण यांच्यावर जाहीरपणे टीका करणारे बॅनर लावण्यात आले.

विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून फिरणाऱ्या अज्ञाताने डोंबिवलीचे विद्यमान आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना डिवचणारे बॅनर शहरात लावल्याचा आरोप चव्हाण समर्थकांकडून करण्यात येत आहे.
या संदर्भात प्रिंटींग व्यवसायिक विनय धोंडू पालव (54) यांच्या फिर्यादीवरून विष्णूनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 196 (1), 356 (2), 356 (3), 356 (4), 270, 3 (5), तसेच कलम 3 महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास (विद्रूपीकरण) प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम 1995 अन्वये जॉली प्रिंटर्सचे कर्मचारी (नाव आणि पत्ता माहित नाही) व इतर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून होर्डींग्ज काढले

मच्छी मार्केट, रंजीत पॅलेस बारसमोर, टिळक चौक, बाजी प्रभू चौक आणि अप्पा दातार चौक अशा 5 ठिकाणी लावलेल्या होर्डींग्जवर सचित्र आणि वादग्रस्त मजकूर छापल्याचे दिसून आले. हे होर्डींग्ज गुरूवारी रात्री साडअकरापूर्वी जॉली प्रिंटर्सच्या कर्मचाऱ्यांनी कुणाच्या तरी सांगण्यावरून आपसात संगनमत करून पाच चौकांत सुरक्षेची काळजी न घेता लावले.

तसेच शहराचे विद्रुपीकरण करत मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांमध्ये सामाजिक तेढ निर्माण करून त्यांची बदनामी केल्याचा आरोप विनय पालव यांनी त्यांच्या फिर्यादीत केला आहे. मात्र कायदा, शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या हेतूने पोलिसांनी तत्परतेने हे पाचही होर्डींग्ज त्या त्या ठिकाणाहून काढून ताब्यात घेतले आहेत.