Thursday, June 25, 2026
Latest:
सामाजिक

सारसबागेची ‘शाहीनबाग’ होऊ देणार नाही; पुण्यात हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक!

प्रशासकीय अपयशाचा निषेध करत २७ मे रोजीच्या बकरी ईदसाठी प्रतिबंधात्मक आदेशांची मागणी

पुणे: ऐतिहासिक वारसा आणि हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या सारसबाग व श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी आज विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. रमजानच्या काळात या परिसरात झालेल्या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर, प्रशासकीय अनास्थेचा निषेध करण्यासाठी आणि सारसबागेची ‘शाहीनबाग’ होऊ न देण्याचा निर्धार करत ‘हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन’ पार पडले.

प्रशासकीय अपयशाचा तीव्र निषेध

आंदोलकांनी प्रशासनावर गंभीर ताशेरे ओढले. २२ मार्च रोजी रमजानच्या काळात हजारोंच्या संख्येने जमाव गोळा होणे, ही सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. “ही सारसबाग आहे की शाहीनबाग?” असा संतप्त सवाल उपस्थित करत, पेशवेकालीन वारसा लाभलेल्या या पवित्र स्थळाची सुरक्षा राखण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या घटनेमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या:

२२ मार्च रोजीच्या गर्दीला परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.

आगामी २७ मे रोजी होणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सारसबाग परिसरात गर्दी, मांसाहार किंवा कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी आतापासूनच प्रतिबंधात्मक आदेश लागू करावेत.

सारसबाग मंदिर परिसरात कोणत्याही बिगर-हिंदू सामूहिक कार्यक्रमांना कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी.

या घटनांना केवळ योगायोग न मानता ‘धार्मिक अतिक्रमण’ समजून शासनाने याकडे अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने गांभीर्याने पाहावे.

मान्यवरांची उपस्थिती

या आंदोलनात विश्व हिंदू परिषदेचे दादा वेदक, सीए सर्वेश मेहेंदळे, पतित पावन संघटनेचे स्वप्नील नाईक, स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंचचे विद्याधर नारगोलकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचचे दयानंद बंडगर आणि हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले यांसह अनेक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. सामूहिक आरतीने या आंदोलनाची सांगता झाली.