Skip to content
मुंबई दि.२६ :- जैन तेरापंथ समाजातील व्यावसायिकांनी आपल्या समाजातील युवकांच्या उन्नतीसाठी स्थापन केलेले ‘आयएएस’ स्पर्धा प्रशिक्षण वर्ग तसेच इतर उपक्रमांचा लाभ सर्वच समाजांमधील युवकांना करुन द्यावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.
जैन तेरापंथ समाजातील व्यावसायिकांच्या ‘तेरापंथ प्रोफेशनल फोरम’ या संस्थेतर्फे ‘लघुतेकडून प्रभुतेकडे’ या विषयावरील दोन दिवसांच्या १६ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उदघाटन राज्यपाल बैस यांच्या मुख्य उपस्थितीत ठाणे येथील नंदनवन परिसरात झाले. त्यावेळी ते बोलत होते.
जैन तेरापंथ समाजाचे अध्यात्मिक प्रमुख आचार्य महाश्रमण, साध्वी प्रमुखा विश्रुत विभा, मुनी महावीर कुमार, तेरापंथ प्रोफेशनल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज ओस्तवाल, विश्वस्त चंद्रेश बाफना, रायपूरचे माजी महापौर गजराज पगारिया, मदन तातेड तसेच फोरमचे सदस्य व भाविक यावेळी उपस्थित होते. दुर्गुणांचा त्याग व सद्गुणांचा विकास केल्यास मनुष्य देवत्वाकडे वाटचाल करतो, असे आचार्य महाश्रमण यांनी सांगितले.