Skip to content
मुंबई दि.२४ :- मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव (दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या पत्नी) यांचे आज सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. सीमा देव यांच्या पश्चात अभिनय, अजिंक्य हे दोन पुत्र, सूना, नातवंडे असा परिवार आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांना ‘अल्झायमर ( विस्मरण) आजार झाला होता.
सीमा देव यांनी शाळेत असल्यापासूनच नृत्याची आवड जोपासली. कल्याणजी-आनंदजींपैकी आनंदजीं यांच्या वाद्यवृंदात त्या गाणी गात असत. सीमा देव यांनी ८० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या होत्या. सीमा देव यांचे मूळ नाव नलिनी सराफ होते.
‘आलिया भोगासी’ या चित्रपटाद्वारे त्यांनी १९५७ मध्ये रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. ‘जगाच्या पाठीवर’, ‘मोलकरीण’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘या सुखांनो या’, ‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या ‘आनंद’ चित्रपटात रमेश व सीमा देव यांनी काम केले होते. २०१७ मध्ये पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफमधील) पुरस्कार सोहळ्यात त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.