ठळक बातम्या

एल निनोचे संकट: मुख्यमंत्र्यांचे जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश

मुंबई: पॅसिफिक महासागरातील ‘एल निनो’च्या वाढत्या प्रभावामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्य सरकार सरसावले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंधारणाची कामे आणि ‘जलयुक्त शिवार २.०’ अभियानाला युद्धपातळीवर गती देण्याचे आदेश दिले आहेत. विशेषतः भूजल पातळी खालावलेल्या भागात प्राधान्याने कामे करून पाणीसाठा वाढवण्यावर त्यांनी भर दिला आहे.

आज मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानी मृद व जलसंधारण विभागाची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. यावेळी जलसंधारण मंत्री संजय राठोड आणि विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जलयुक्त शिवार २.० : १५ मे पूर्वी आराखडे मंजूर होणार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात समाविष्ट गावांमध्ये दुरुस्तीच्या कामांची निकड ओळखून ती त्वरित आराखड्यात समाविष्ट करावीत.

राज्यस्तरीय आराखडे: १५ मे पूर्वी सर्व राज्यस्तरीय आराखडे मंजूर करून जिल्ह्यांना सुधारित उद्दिष्टे दिली जातील.

अतिरिक्त कामे: नियोजित गावांव्यतिरिक्त बाहेरील १० टक्के कामेही प्राधान्यक्रमाने हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नाला खोलीकरण आणि बांबू लागवड

जलसंधारणाच्या कामांमध्ये नाविन्यपूर्ण बदल सुचवताना मुख्यमंत्री म्हणाले की, “नाला खोलीकरण केल्यानंतर त्यात पुन्हा गाळ साचू नये, यासाठी नाल्यांच्या काठावर बांबू लागवड करण्याचा विचार करावा.” यामुळे जमिनीची धूप थांबेल आणि जलस्त्रोत अधिक काळ टिकून राहण्यास मदत होईल.

विदर्भातील मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन

विदर्भातील जलसिंचनासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीबाबत मुख्यमंत्र्यांनी विशेष निर्देश दिले आहेत. या तलावांच्या दुरुस्तीची सर्व कामे जून महिना संपण्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे, जेणेकरून पावसाळ्यातील पाणी साठवता येईल.

केंद्र सरकारच्या योजनांचा आधार

केंद्र शासनाच्या ‘विकसित भारत-जी राम जी’ योजनेचा लाभ घेऊन राज्यातील जलसंधारणाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. ज्या ठिकाणी भूजल पातळी कमालीची घटली आहे, अशा ठिकाणी तातडीने उपाययोजना करून भूजल पुनर्भरणावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.