धर्म संस्कृती

खाजगी ट्रॅव्हल्सची लूट थांबवण्यासाठी राज्य सरकार कडक कायदा करणार; परिवहन मंत्र्यांचे ‘सुराज्य अभियानाला’ आश्वासन

मुंबई: उन्हाळी सुट्ट्या, दिवाळी आणि गणेशोत्सवाच्या काळात खाजगी बस चालकांकडून होणारी प्रवाशांची लूट आता थांबणार आहे. खाजगी प्रवासी बस वाहतूकदारांवर वचक बसवण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवा कायदा करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. हिंदु जनजागृती समिती प्रणित ‘सुराज्य अभियाना’च्या शिष्टमंडळासोबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.

​५० टक्के जादा दराच्या नियमाची होणार कडक अंमलबजावणी

​सध्याच्या सरकारी निर्णयानुसार, खाजगी बस चालकांना एस.टी. महामंडळाच्या दरापेक्षा केवळ ५० टक्के अधिक तिकीट दर आकारण्याची मुभा आहे. मात्र, प्रत्यक्षात ऑनलाईन ॲप्स आणि खाजगी ट्रॅव्हल्स चालक अव्वाच्या सव्वा दर आकारून सर्वसामान्यांची आर्थिक लूट करत आहेत. यावर उपाय म्हणून येत्या विधानसभा अधिवेशनात कडक कायदा मांडण्याचा सरकारचा मानस असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

‘कॉर्पोरेट जिहाद’ची एनआयएमार्फत चौकशी करा; हिंदु जनजागृती समितीची राज्यपालांकडे मागणी

​बेकायदेशीर १८ ॲप्सवर कारवाईचे संकेत

​पुणे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी ६ मार्च २०२४ रोजी केंद्र सरकारची परवानगी न घेता व्यवसाय करणाऱ्या १८ खाजगी प्रवासी ॲप्सवर (उदा. रेड बस, मेक माय ट्रीप, रॅपीडो, इन ड्राईव्ह इ.) बंदी घालण्याची सूचना केली होती. यासंदर्भात सुराज्य अभियानाने केलेल्या मागणीची दखल घेत, या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी सहपरिवहन आयुक्त आणि सुराज्य अभियानाचे तीन प्रतिनिधी यांची एक ‘विशेष समिती’ स्थापन करण्याचा निर्णय मंत्र्यांनी घेतला आहे.

​बैठकीतील इतर महत्त्वाचे निर्णय:

  • एस.टी. टोल फ्री क्रमांक: बस आगारांमधील ७० टक्के दूरध्वनी सेवा बंद असल्याच्या तक्रारीनंतर, प्रवाशांच्या सोयीसाठी तात्काळ टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्याचे आदेश महामंडळाला देण्यात आले आहेत.
  • शुद्धलेखन सुधारणा: बेस्ट आणि एस.टी. बसेसमध्ये मराठी सूचना लिहिताना होणाऱ्या व्याकरणाच्या चुका सुधारण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले.
  • बसस्थानक स्वच्छता: प्रवाशांकडून घेतल्या जाणाऱ्या २ टक्के अधिभाराचा विनियोग स्वच्छ बसस्थानके, पिण्याचे पाणी आणि प्रसाधनगृहांच्या सोयीसाठी प्रभावीपणे केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

​या बैठकीला परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट, सुराज्य अभियानाचे अभिषेक मुरुकटे, डॉ. अंजेश कणगलेकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सुराज्य अभियानाने परिवहन क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी केलेल्या अभ्यासाचे आणि प्रयत्नांचे मंत्री सरनाईक यांनी यावेळी कौतुक केले.