Skip to content
मुंबई दि.१९ :- बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी कोणताही प्रमुख तलाव सध्या ओसंडून वाहत नाही, असे बृहन्मुंबई महापालिकेच्या जल अभियंता खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणारे तलाव ओसंडून वाहत असल्याच्या बातम्या समाज माध्यमांमधून आणि काही प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित होत आहेत. काही माध्यमांद्वारे मुंबईची पाण्याची चिंता मिटली असल्याचा आशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याने मुंबईची पाण्याची चिंता मिटली असे म्हणणे वस्तुस्थितीला धरून होणार नाही, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
आज पहाटे सहा वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार प्रमुख तलावांपैकी सर्वात मोठा तलाव असणाऱ्या ‘अप्पर वैतरणा’ तलावातील जलसाठा ७१.०९ टक्के तर भातसा तलावातील जलसाठा ७८.१६ टक्के आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व सातही तलावांमध्ये एकूण जलसाठा हा ८३.५१ टक्के आहे. ही बाब लक्षात घेता मुंबईची पाणी चिंता ही काही प्रमाणात निश्चितपणे दूर झाली असली, तरी अद्याप पूर्णपणे मिटलेली नाही, ही बाब स्पष्ट आहे, असे जल अभियंता खात्याचे म्हणणे आहे.
दरवर्षी १ ऑक्टोबर ही तारीख पाणीपुरवठा नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाची तारीख असून या दिवशी सर्व तलावांमधील जलसाठा १०० टक्के असल्यास पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने सदर बाब ही समाधानकारक मानण्यात येते. त्यामुळे यावर्षी ऑक्टोबर महिन्यातील जलसाठा किती असेल त्यावर पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन अवलंबून असते, असेही जल अभियंता खात्याद्वारे कळविण्यात आले आहे.