मुंबई दि.१९ :- पंतप्रधान निवास योजनेची (शहरी) राज्यात प्रभावी अंमलबजावणी करून लाभार्थींना तातडीने घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्पांना गती द्यावी, अशी सूचना गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केली. पंतप्रधान निवास योजना (शहरी) अंतर्गत राज्यात शासकीय / खासगी भूखंडांवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प व मध्यम उत्पन्न गटांसाठी संयुक्त भागिदारी तत्वावर गृहनिर्माण प्रकल्प राबविले जात आहेत.
याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यालयाचे उदघाटन सावे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. ज्या प्रकल्पांची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत ती कामे तातडीने सुरू करून दर आठवड्याला त्याचा आढावा घेण्यात यावा. लाभार्थ्यांना प्रकल्पांबाबतची तसेच कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकांसोबत चर्चा करून त्याबाबतची माहिती द्यावी.
यासाठी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत लाभार्थींची यादी तयार करून त्यांच्यापर्यंत पोहोचवावी, असेही सावे यांनी सांगितले. महाहौसिंगचे व्यवस्थापकीय संचालक अजित कवडे यांनी सादरीकरणाद्वारे पंतप्रधान निवास योजनेंतर्गत राज्यात सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, अवर सचिव तथा महाहाऊसिंगचे संचालक रविंद्र खेतले, प्रकल्प व्यवस्थापन नियंत्रक मुकुल बापट आदी उपस्थित होते.