Skip to content
मुंबई दि.१८ :- गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने घेतला आहे. एक लिटर पामतेल आणि प्रत्येकी एक-एक किलो साखर, रवा, चणाडाळ शिधापत्रिकाधारकांना ‘ आनंदाचा शिधा’ म्हणून देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. एकूण नऊ महत्त्वाच्या निर्णयांना या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडण्यासंबंधीचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला.
भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना असे या उपक्रमाचे नाव आहे. ‘आयटीआय’ मधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थींच्या विद्यावेतनात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशिक्षणार्थींना आता दरमहा ५०० रुपये मिळणार आहेत. मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी देण्यात आली आहे.