मुंबई, ठाण्यासह डोंबिवली, कल्याणमध्ये अवकाळी पाऊस
मुंबई, दि. २१
मुंबई, ठाण्यासह डोंबिवली, कल्याण परिसरात मंगळवारी सकाळी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. मुलुंड, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहीसर या भागांत तसेच दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर येथही गडगडाटासह पाऊस झाला. पावसामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांची तारांबळ उडाली.
कल्याण डोंबिवलीत मंगळवारी पहाटे साडेपाच,सहा वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह दमदार हजेरी लावली. वृत्तपत्र विक्रेते, शाळेत जाणारे विद्यार्थी यांचीही त्रेधातिरपीट उडाली. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पहाटेपासून भाजीपाला विक्री करणारे विक्रेते, खरेदीदार, वाहन चालक यांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला.
पालघर आणि डहाणूमध्येही वीजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी पिकांचे आणि बागायती शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
——–
