कल्याणचे सामाजिक कार्यकर्ते सदाशिव चव्हाण यांना दिल्लीत ‘संत ईश्वर सन्मान २०२६’ प्रदान
कल्याणचे सामाजिक कार्यकर्ते सदाशिव चव्हाण यांना दिल्लीत ‘संत ईश्वर सन्मान २०२६’ प्रदान
ठाणे:
महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक कार्य करणारे कल्याण येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सदाशिव चव्हाण यांना प्रतिष्ठित ‘संत ईश्वर सन्मान २०२६’ प्रदान करण्यात आला आहे. नवी दिल्ली येथे आयोजित एका भव्य पुरस्कार सोहळ्यात भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते चव्हाण यांना हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
बेघर, अनाथ, परित्यक्त आणि वंचित मुलांचे पुनर्वसन, त्यांचे शिक्षण, आरोग्य तसेच सर्वांगीण विकासासाठी सदाशिव चव्हाण यांनी बहुमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊनच त्यांची या राष्ट्रीय सन्मानासाठी निवड करण्यात आली.
त्यांच्या ‘जीवन संवर्धन फाउंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून सुरक्षित निवासी गुरुकुल, दर्जेदार शिक्षण, संस्कार, जीवनकौशल्ये आणि आत्मनिर्भरतेच्या अनेक संधी गरजू मुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या उपक्रमांचा लाभ आतापर्यंत १,००० हून अधिक मुले आणि त्यांच्या कुटुंबांना झाला आहे.
या सन्मानामुळे कल्याणसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

