डोंबिवलीत ‘सुमित एलको’च्या कारभाराची पोलखोल; उपायुक्त डॉ. रामदास कोकरे यांच्या ‘सरप्राईज व्हिजिट’ने खळबळ
डोंबिवलीत ‘सुमित एलको’च्या कारभाराची पोलखोल; उपायुक्त डॉ. रामदास कोकरे यांच्या ‘सरप्राईज व्हिजिट’ने खळबळ
४८ तासांचा अल्टिमेटम; कंत्राट रद्द करून महापालिकेमार्फतच सफाईची भाजप नगरसेवकांची आक्रमक मागणी
डोंबिवली:
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २७ मध्ये गेल्या आठवडाभरापासून निर्माण झालेल्या कचऱ्याच्या भीषण समस्येवर अखेर प्रशासनाकडून धडक कारवाईला सुरुवात झाली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. रामदास कोकरे यांनी मंगळवारी सकाळी मारलेल्या ‘सरप्राईज व्हिजिट’ मुळे कंत्राटदार ‘सुमित एलको’ कंपनीच्या ढिसाळ कारभाराचा पर्दाफाश झाला. कंपनीच्या अत्यंत गचाळ आणि बिनधास्त कारभारावर तीव्र संताप व्यक्त करत डॉ. कोकरे यांनी कंत्राटदार कंपनीला कामकाम सुधारण्यासाठी थेट ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे.

कचऱ्याचे ढीग आणि नागरिकांचे हाल; स्थानिक नगरसेवक आक्रमक
प्रभाग २७ मधील टिळकनगर, पाथर्ली, अंबिकानगर आणि गोग्रासवाडी परिसरात गेल्या ७ ते ८ दिवसांपासून कचरा उचललाच गेला नव्हता. ठिकठिकाणी कचऱ्याचे साचलेले ढीग, दुर्गंधी आणि आरोग्याचा उद्भवलेला प्रश्न यांमुळे नागरिक अक्षरशः बेजार झाले होते.
कचरा संकलनाचे कंत्राट असलेल्या ‘सुमित एलको’ कंपनीचे कर्मचारी वेळेवर न येणे, कर्मचारी गणवेशात नसणे, कर्मचाऱ्यांच्या नियोजनाचा अभाव असणे अशा अनेक तक्रारी स्थानिक नागरिक आणि भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांकडे येत होत्या. काही सोसायट्यांमध्ये तर कचरा बाहेर न टाकता तो घरातच साठवून ठेवण्याची पाळी रहिवाशांवर आली होती. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांनी उपायुक्त डॉ. रामदास कोकरे यांना प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आग्रही निमंत्रण दिले होते.
गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याच्या दलदलीत पुन्हा एक व्यक्ती अडकला!
दोन तासांची धडक पाहणी; कंत्राटदाराची बोलती बंद
नगरसेवकांच्या विनंतीची तातडीने दखल घेत उपायुक्त डॉ. रामदास कोकरे यांनी मंगळवारी सकाळी ९:३० वाजल्यापासून सलग दोन तास प्रभागातील विविध भागांची पायी फिरून पाहणी केली. पाहणीदरम्यान प्रत्यक्षात अनेक भागांत साफसफाई करणारे कर्मचारीच गायब असल्याचे निष्पन्न झाले.
उपायुक्तांनी तात्काळ सुमित एलको कंपनीच्या व्यवस्थापकांना व जबाबदार अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले. प्रत्यक्ष परिस्थिती दाखवून देत कंपनीच्या व्यवस्थापनाची कसून चौकशी केली आणि ४८ तासांच्या आत प्रभागातील स्वच्छता व्यवस्था पूर्ववत न झाल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला.

कंत्राट रद्द करा; महासभेत आवाज उठवण्याचा इशारा
दरम्यान, या पाहणीदरम्यान भाजप लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेत महापालिका आयुक्तांकडे महत्त्वाची मागणी नोंदवली. “पूर्वी महापालिकेच्या स्वतःच्या सफाई कर्मचाऱ्यांमार्फत प्रभागात अतिशय उत्तम स्वच्छता होत होती. परंतु, जेव्हापासून हे काम सुमित एलको कंपनीला दिले आहे, तेव्हापासून कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे,” असा गंभीर आरोप नगरसेवकांनी केला.
त्यामुळे प्रभाग २७ मधील सुमित एलको कंपनीचे कंत्राट तात्काळ रद्द करण्यात यावे आणि पूर्वीप्रमाणेच महापालिकेकडून स्वच्छता मोहीम राबवली जावी, अशी मागणी करण्यात आली. ही मागणी आगामी महासभेतही लावून धरली जाईल, असा इशारा भाजप नगरसेवकांनी दिला.

गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याचा प्रश्न ऐरणीवर; पोलिसांत तक्रार
या पाहणी दौऱ्यादरम्यान गोग्रासवाडी परिसरातील एका अनधिकृत गोठ्याची गंभीर समस्याही उपायुक्त डॉ. कोकरे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
* दलदलीचा धोका: या अनधिकृत गोठ्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून साचलेल्या शेणामुळे परिसरात मोठी दलदल निर्माण झाली आहे.
* अपघाताची घटना: काही दिवसांपूर्वीच या दलदलीत एक व्यक्ती अडकून पडल्याची अत्यंत धोकादायक घटना घडली होती.
याची गंभीर दखल घेत उपायुक्तांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. यावेळी टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजु पाचोरकर यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेण्यात आल्या. प्रशासकीय स्तरावर तातडीने पावले उचलत संबंधित अनधिकृत गोठा मालकाविरोधात महापालिकेच्या वतीने पोलीस तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
कल्याणचे सामाजिक कार्यकर्ते सदाशिव चव्हाण यांना दिल्लीत ‘संत ईश्वर सन्मान २०२६’ प्रदान
पाहणीवेळी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती
या संपूर्ण पाहणी दौऱ्यात भाजपचे वरिष्ठ नगरसेवक महेश पाटील, नगरसेविका मंदाताई पाटील, शिक्षण समिती सभापती तथा नगरसेवक अभिजित थरवळ, भाजप कल्याण जिल्हा सचिव तथा प्रभाग प्रभारी ॲड. मनोज प्रकाश घरत, संजय विचारे, माजी परिवहन समिती सदस्य संजय (अण्णा) राणे, युवा मोर्चाचे गोपाल देशपांडे, गणेश मगरे यांच्यासह स्थानिक नागरिक, कार्यकर्ते व पालिका अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

