संघटित- असंघिटत महिला कामगारांच्या न्याय हक्कांसाठी भारतीय मजदूर संघ संघर्ष करणार
पुणे दि.०९ :-विविध क्षेत्रातील संघटित आणि असंघिटत महिला कामगारांच्या न्याय हक्कांसाठी भारतीय मजदूर संघ संघर्ष करेल, असे प्रतिपादन भारतीय मजदूर संघाच्या प्रदेश उपाध्यक्ष अश्विनी देव यांनी येथे केले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ‘भामसंघ’ कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर मेळाव्यात त्या बोलत होत्या.
संघटीत आणि असंघटित या दोन्ही क्षेत्रांत काम करणाऱ्या महिला कामगारांच्या विविध न्याय मागण्या शासन, प्रशासकीय पातळीवर प्रलंबित आहेत. त्याचा पाठपुरावा करण्यात येईल आणि प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष केला जाईल, असेही देव यांनी सांगितले.
मेळाव्याचे उदघाटन ओरिएंटल रबर इंडस्ट्रीज लिमिटेडच्या एच.आर. विभागाच्या अध्यक्षा अवंतिका मकर यांच्या हस्ते झाले. स्माईल वेलनेस फाउंडेशनच्या संस्थापक संचालिका डाॅ. सुरेखा भालेराव यांनीही मनोगत व्यक्त केले.
महिला कामगारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी व्यवस्थापनाने घ्यावी, सार्वजनिक प्रवासासाठी राखीव जागांची संख्या वाढविण्यात येऊन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावी. महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी चांगली स्वंछतागृहे असावीत, आदि मागण्याही मेळाव्यात करण्यात आल्या.
या मेळाव्यात विविध ऊद्योगातील विजयाताई काडगी, वनिता खांदवे ,सुवर्णा खेसे, रेश्मा गोसावी, स्वप्नाली हगवणे, ह.भ. प. श्रुतकिर्ती धस, ललिता पवार, जयश्री रगडे, शांताताई लांडगे, नंदाताई धोत्रे, ज्योती कदम या महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना कामठे तर प्रास्ताविक ॲड. संध्या खरे यांनी केले.