मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ठाण्यात नवा उड्डाणपूल
मुंबई दि.२० :- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) कोपरी ते पटणी दरम्यान उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
पुलाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने निविदा मागविल्या असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अहवालाच्या कामास सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानंतर सहा महिन्यात यासंबंधीचा अहवाल येणे सादर होणे अपेक्षित आहे.
हा नियोजित पूल सुमारे ६०० मीटर लांबीचा असून पुलाला जोडणारा रस्ता सुमारे ४०० मीटर लांबीचा असणार आहे. कोपरी येथील विसर्जन घाटापासून पुलाची सुरुवात होणार आहे. या कामासाठी २३४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. अहवाल सादर झाल्यानंतर पुढे प्रत्यक्ष पुलाच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. या पुलामुळे ठाणे ते नवी मुंबई प्रवास जलद होणार आहे.