ठळक बातम्या

Maha Political : आधी कोथरूड आता कसबा गृहित धरणा-यांना धडा शिकवा

(शेखर जोशी)

जे कोथरूड मतदार संघात झाले तेच आता कसबा मतदार संघात घडते आहे, घडवून आणले जात आहे. दोन्ही ठिकाणची परिस्थिती जरी वेगळी असली तरी ‘सॉफ्ट टार्गेट’ ‘कुलकर्णी’ आणि ‘टिळक’ हेच आहेत हे स्पष्ट आहे.‌ ‘नाना फडणविशी’ खेळी तेव्हाही खेळली गेली आणि आताही खेळली गेली आहे.‌ त्यामुळे ‘आधी कोथरूड आता कसबा गृहित धरणा-यांना मतपेटीतून धडा शिकवा’ असे म्हणण्याची आणि कृती करण्याची वेळ आली आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यासाठी सुरक्षित मतदार मतदार संघ हवा म्हणून तेव्हा प्रा. मेधा कुलकर्णी यांचा ‘राजकीय बळी’ घेण्यात आला. जे चंद्रकांत पाटील इतकी वर्षे कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करतात त्यांना स्वतः:ला इतक्या वर्षांत कोल्हापूर मतदार संघ का बांधता आला नाही? हे त्यांचे आणि भाजपचे अपयशच म्हणायचे.

जपान-भारत आणि महाराष्ट्र-वाकायामा हे नाते आदर्श ठरेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बरे, चंद्रकांत पाटील यांना अगदी सुरक्षितच मतदार संघ हवाच होता तर तो डोंबिवली विधानसभा मतदारसंघ हा ही होता. अगदी शंभर टक्के ‘चंपा’ इथून निवडून आले असते. पण जी हिंमत कोथरूड मतदार संघात मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी कापण्यात देवेंद्र फडणवीस यांनी आणि भाजपच्या चाणक्यांनी दाखविली ती त्यांनी डोंबिवलीत रवींद्र चव्हाण यांच्याबाबतीत दाखविली नाही. कारण भाजपसाठी ‘चव्हाण’ यांच्यापेक्षा ‘कुलकर्णी’ हे सॉफ्ट टार्गेट होते.

फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी डोंबिवलीत चव्हाण यांची उमेदवारी रद्द केली असती तर कदाचित मनी मसल पॉवर असलेल्या चव्हाण यांनी वेगळी वाट निवडली असती. आणि ते चंद्रकांत पाटील यांच्यासाठीही अडचणीचे ठरले असते. त्यामुळे भाजपच्या ‘फडणविशी’ खेळीने त्या तुलनेत कमी त्रासदायक किंवा त्रासदायक ठरणारच नाही, अशा ‘कुलकर्णी’ यांची उमेदवारी रद्द केली.

कोणतीही करवाढ नसलेला महापालिकेचा अर्थसंकल्प सादर – एकूण अर्थसंकल्प ५२,६१९ कोटी रुपयांचा

आता तीच खेळी कसबा मतदार संघात खेळली जात आहे. जो न्याय चिंचवड मतदार संघासाठी लावण्यात आला तोच न्याय कसबा मतदार संघासाठी लावण्यात येणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. चिंचवड आणि कसबा येथील उमेदवार जाहीर करण्यापूर्वी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी टिळक कुटुंबीयांची भेट घेतली आणि दिवंगत मुक्ता टिळक यांचे पती आणि मुलाची ‘समजूत’ काढली. यात गंमत अशी की टिळक कुटुंबातील एकाची पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती केली. खरे तर त्याची काहीच आवश्यकता नव्हती. पण आता टिळक कुटुंबातील एकाला पक्षप्रवक्तेपद दिल्याने पुन्हा कुटुंबातील अन्य व्यक्तीला उमेदवारी कशी द्यायची? असे साळसुदपणे सांगितले गेले. बिंबवले गेले.

मुंबई शहर वाहतूक प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात १,१०१ कोटी रुपयांची तरतूद

हे सर्व करणे म्हणजे मतदारांना गृहीत धरणे आहे. आपण काहीही केले तरी मते आपण ज्याला ऊभा करू तोच निवडून येणार, पारंपारिक मतदार झाले गेले विसरून त्यालाच मतदान करणार, असा आत्मविश्वास भाजपच्या चाणक्यांना आहे आणि तो चुकीचा किंवा खोटा नाही. हेच सर्व ठिकाणी चालत आले आहे. या गृहीत धरण्याला कुठेतरी आळा बसण्याची, फाजील आत्मविश्वासाचा फुगा फोडण्याची वेळ आली आहे. एकदा तरी धडा मिळू दे, निकाल वेगळा लागू दे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *