केंद्र सरकारच्या मिश्र औषध उपचार पध्दतीला इंडियन मेडिकल असोसिएशनचा विरोध
मुंबई दि.२१ :- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशामध्ये एकात्मिक औषध प्रणाली (मिश्र पॅथी) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्याचा सध्याच्या वैद्यक शास्त्रावर परिणाम होणार असून आयुर्वेद नष्ट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या पद्धतीला विरोध असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनकडून सांगण्यात आले.
सर्व वैद्यकीय उपचार पद्धतींच्या अवैज्ञानिक मिश्रणामुळे आरोग्य सेवेचा ऱ्हास होऊन देशातील आरोग्य सेवा एका शतकाने मागे जाईल. याचा परिणाम सर्वसामान्यांना भोगावा लागेल. त्यामुळे मिश्र पॅथी ही लोकांविरोधी असल्याचे असोसिएशनशचे म्हणणे आहे.
या अवैज्ञानिक मिश्रणामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्य व्यवस्था कमकुवत होण्याची शक्यताही असोसिएशनकडून व्यक्त करण्यात आली आहे. मिश्र वैद्यकीय उपचार पद्धतीचे दुष्परिणाम नागरिकांना समजावून सांगण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत.
