तारांकित प्रश्नातील वगळण्यात आलेल्या प्रकरणाची चौकशी केली जाईल – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
नागपूर दि.२१ :- तारांकित प्रश्नातील मंत्र्यांसह सत्ताधारी आमदारांशी संबंधित भाग परस्पर वगळल्याने बुधवारी विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
‘टीईटी’ घोटाळ्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नातील सत्तारुढ पक्षातील मंत्र्याशी आणि आमदारांशी संबंधित दोन भाग परस्पर वगळल्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात संताप व्यक्त केला.
विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेला प्रश्न अत्यंत गंभीर असून सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना बदलण्याचा कोणालाही अधिकार नाही, त्यामुळे अधिवेशन संपण्यापूर्वी या प्रकरणाची चौकशी करुन त्याची माहिती सभागृहात देण्यात येईल व दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी दिली. त्यानंतर हा प्रश्न उत्तरासाठी आणि निवेदनासाठी राखून ठेवण्यात आला.