ठाणे जिल्हा परिषदेतर्फे पाच तालुक्यांमध्ये एक हजार वनराई बंधारे बांधण्यात येणार
ठाणे दि.१५ :- भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी तसेच गाव आणि पाड्यांजवळ नवीन जलस्त्रोत निर्माण व्हावे, या उद्देशाने ठाणे जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यातील पाच तालुक्यांच्या हद्दीत एक हजार वनराई बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण, मुरबाड, शहापूर, भिवंडी, अंबरनाथ आणि उल्हासनगर तालुक्यांमधील डोंगर, माळरान क्षेत्रात हे बंधारे बांधले जाणार आहेत भूजल पातळी बरोबर गोधन, जंगली प्राण्यांना पिण्यासाठी जंगलात पाण्याचे साधन तयार व्हावे. जमिनीची धूप रोखणे आणि बंधारा परिसरात नवीन झाडांची लागवड करण्यात येणार आहे.
कल्याण तालुक्यात १००, अंबरनाथ १००, मुरबाड, शहापूर भाग डोंगराळ असल्याने या भागात प्रत्येकी ३०० बंधारे, भिवंडी भागात २०० बंधारे बांधण्यात येणार आहेत. कल्याण तालुक्यात नडगाव, म्हसकळ, आपटी, कोसले, अंताडे, बापसई, उशीद, कोलम, पोई, नालिंबी, रेवती, आंबिवली, वावेघर, वसतशेलवली येथे एकूण ३३ वनराई बंधाऱ्यांची बांधणी पूर्ण झाली आहे. गटविकास अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली ही कामे केली जाणार आहेत. गाव, खेड्यात घराघरांच्या परिसरात कुपनलिका बसविण्यात आल्या आहेत.
कुपनलिकेला पाणी लागत नाही म्हणून अनेकांनी या नलिका ५०० ते ६०० मीटर नियमबाह्य खोदल्या आहेत. यामुळे बेसुमार पाण्याचा उपसा जमिनीतून होत आहे. वाढत्या उपशामुळे भूजल पातळी कमी होत आहे. मार्च नंतर बहुतांशी गावांमध्ये पाणी टंचाई सुरू होते. हे पाणी टंचाईचे भीषण संकट दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन गाव, पाड्यांच्या परिसरात वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन केले आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम प्रशासनाने हाती घेतला आहे.
