कर्तव्य पथावरील संचलनातील महाराष्ट्राच्या कलावंतांची कामगिरी गौरवस्पद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २२ :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलनात कलावंतांनी कमी कालावधीत उत्कृष्ट कामगिरी सादर करीत द्वितीय क्रमांक पटकावला. ही महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब असून या चित्ररथाच्या सादरीकरणात सहभागी कलावंत कौतुकास पात्र आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथील कर्तव्य पथावर राज्याचा ‘साडेतीन शक्तिपीठे : नारीशक्ती’ या चित्ररथाचे उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या तसेच राज्यगीताची संगीतमय निर्मिती करणाऱ्या कलावंतांचा सत्कार सोहळा आज मंत्रालयातील ‘त्रिमूर्ती’ प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. चित्ररथ निर्मिती कलावंत, चित्ररथाबरोबर नृत्य करणारे कलांवत, राज्यगीताचे कलांवत आणि महाराष्ट्र वाद्य गीत सादर करणारे गायक नंदेश उमप, गायिका वैशाली सामंत, वैशाली माडे, कौशल इनामदार, कमलेश भडकमकर, प्राची गडकरी, पंकज इंगळे, आनंदी जोशी, विशाल भांगे आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला. यानिमित्त ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सरकारी सवलतीचा सकारात्मक विचार करून मिळालेल्या संधीचे सोने करा- प्रदीप पेशकार
महाराष्ट्रातर्फे कर्तव्य पथावर सादर झालेल्या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठाबरोबरच नारी शक्तीच्या सन्मानाची माहिती देशभरात पोहोचली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषकाचे यंदा ३५० वे वर्ष आहे. यानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यात विविध कार्यक्रम आयोजित केले जावेत. त्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पोहोचवावे, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रधान सचिव खारगे, वैशाली सामंत यांनीही मनोगत व्यक्त केले. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हा सांस्कृतिक कार्यक्रमात गायिका वैशाली सामंत, नंदेश उमप, वैशाली माडे, आनंदी जोशी, विशाल भांगे आदींनी विविध गीते सादर केली.
