बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला ‘वारसा विचारांचा’ परिसंवाद

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.१७ :- शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सावरकर सभागृहात बुधवारी ‘वारसा विचारांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर, राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्री, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आदी यावेळी उपस्थित होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी मराठीत अनुवादित केलेल्या ‘सावरकर विस्मृतीचे पडसाद’ आणि ‘सावरकर एक वादग्रस्त वारसा’ या दोन खंडांचे प्रकाशन मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. विक्रम संपत यांनी लिहिलेल्या या मूळ इंग्रजी पुस्तकांचे हे अनुवाद आहेत.

या वेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले, काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, ११ वर्षे अनन्वित अत्याचार सहन केले, त्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी अवमानास्पद वक्तव्य केले. प्रखर राष्ट्रभक्तीचे प्रतिक असलेल्या सावरकरांविषयी गरळ ओकणाऱ्या राहुल गांधींच्या यात्रेला भारत जोडो नव्हे, ‘भारत छोडो’ असेच म्हणावे लागेल. कॉंग्रेसने जाणीवपूर्वक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची अवहेलना केली. ती आजतागायत सुरू आहे. यापुढे सावरकरांचा अवमान करणाऱ्यांना जमिनीत गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.

लॉर्ड माउंटबॅटन, त्यांची पत्नी लेडी माउंट बॅटन आणि मुलगी हे जवाहरलाल नेहरूंना सिमला येथे घेऊन गेले. त्यानंतर नेहरूंनी कोणालाही न विचारता देशाच्या फाळणीला परवानगी दिली आणि २० लाख हिंदूंचे हत्याकांड घडले. नेहरू हे लेडी माउंट बॅटन यांना मरेपर्यंत दररोज रात्री पत्र लिहून सर्व घडामोडी कळवायचे. ब्रिटिशांना हेरगिरीसाठी कोणाची स्वतंत्र नेमणूक करण्याची गरज नव्हती, कारण  लेडी माउंट बॅटन सगळी माहिती ब्रिटिशांना पुरवत होत्याच, असे सांगत रणजित सावरकर यांनी नेहरूंच्या गैरकृत्यांचा पुराव्यानिशी पाढा वाचला. संजय उपाध्ये यांनी बाळासाहेब ठाकरे आणि सावरकर यांच्यातील साम्य स्थळे सादर केली.

Leave a Reply

Your email address will not be published.