महापालिकेच्या बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या लोकार्पण
पहिल्या टप्प्यात ५१ ठिकाणी दवाखाने
वैद्यकीय तपासण्यांसह औषधोपचारांची सोय
मुंबई, दि. १५- बृहन्मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे सुरू करण्यात येणा-या बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या (१७ नोव्हेंबर) रोजी दुपारी चार वाजता धारावी परिसरात होणार आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, स्थानिक सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
धारावी परिसरातील शीव – वांद्रे लिंक रस्त्याजवळ असणा-या ‘ओएनजीसी’ इमारतीच्या प्रवेशद्वार क्रमांक २ नजिक आयोजित होणा-या समारंभात दृकश्राव्य प्रणालीचा वापर करुन ५१ ठिकाणी उभारण्यात आलेल्या दवाखान्यांचे उदघाटन आणि लोकार्पण केले जाणार आहे. येत्या ६ महिन्यात ही संख्या २२० दवाखान्यांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.
या दवाखान्यांमध्ये मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी तसेच १४७ प्रकारच्या रक्तचाचण्याही मोफत करण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त क्ष-किरण चाचणी (एक्स रे), सोनोग्राफी यासारख्या चाचण्यांकरीता पॅनलवर असणा-या वैद्यकीय चाचणी केंद्रांमधून करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या चाचण्या जरी खासगी केंद्रातून करण्यात येणार असल्या तरी त्या महानगरपालिका रुग्णालयांच्या दरानुसार शुल्क आकारणी करुन करण्यात येणार आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) मंगला गोमारे यांनी दिली.
हे दवाखाने हे सकाळी ७ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते रात्री १० या कालावधी दरम्यान सुरू असतील. तर उपलब्ध दवाखान्यांमध्ये सुरु करण्यात आलेले दवाखाने सकाळी ९ ते दुपारी ४ आणि दुपारी ३ ते रात्री १० या वेळेत सुरु राहणार आहेत. आहेत.