मुंबई दि.१९ :- राज्यातील दहा लाख विद्यार्थ्यांची शालेय शिक्षण विभागामार्फत नेत्र आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच आवश्यकतेनुसार यातील एक लाख विद्यार्थ्यांना वनसाईट इझीलर लक्झोटिका फाऊंडेशन आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून चष्मे वाटप करण्यात येणार असल्याचेही केसरकर म्हणाले.
शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत ‘रामटेक’ या शासकीय निवासस्थानी याबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी केसरकर बोलत होते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय वाढीस लागावी यासाठी रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शाळांमध्ये दोन हजार ग्रंथालये स्थापन करून दोन लाख पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
वनसाईट फाऊंडेशनच्या स्वतंत्र संचालक श्रीमती स्वाती पिरामल, फाऊंडेशनचे प्रमुख अनुराग हंस, संचालक मंडळाचे सदस्य के.व्ही.महेश, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टचे राजीव मेहता, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रनजितसिंह देओल, सहसचिव इम्तियाझ काझी यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.