क्षयरोगमुक्तीच्या दिशेने सामाजिक बांधिलकीचे महत्त्वपूर्ण पाऊल: रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टतर्फे ‘निक्षय मित्र प्रकल्पा’चा भव्य शुभारंभ
डोंबिवली:
सामाजिक बांधिलकी जपत क्षयरोगग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टच्या वतीने आयोजित ‘निक्षय मित्र प्रकल्पा’चा शुभारंभ सोहळा शुक्रवारी, २१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता रोटरी भवन येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियान’ या संकल्पनेतून राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमांतर्गत ५० गरजू क्षयरोगग्रस्त रुग्णांना पुढील ५ महिन्यांसाठी मोफत अन्नधान्य किट वितरित करण्यात येणार आहेत.

आरोग्य अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) Chief Medical Officer डॉ. दीपा शुक्ला, शास्त्रीनगर हॉस्पिटल (डोंबिवली पश्चिम) च्या Chief Medical Officer डॉ. सादिया पिंजारी, City Tuberculosis Officer डॉ. पौर्णिमा धाके आणि आरोग्य केंद्राच्या (डोंबिवली पश्चिम) Medical Officer डॉ. शीतल पाटील यांची प्रमुख पाहुणे म्हणून विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात Rtn. चक्रपाणी शुक्ला यांच्या सूत्रसंचालनाने झाली. त्यांनी उपस्थितांचे स्वागत करत रोटरी क्लबच्या सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचा आढावा घेतला. यानंतर रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टच्या अध्यक्ष अथर्व जोशी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात Community Service अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध सेवाभावी प्रकल्पांची माहिती दिली.
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टचा कौतुकास्पद उपक्रम; क्षयरुग्णांना मिळणार पोषणाचा आधार!
२०३२ पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे ध्येय
कार्यक्रमादरम्यान प्रकल्प संचालक Rtn. वर्धमान पाटील यांनी ‘निक्षय मित्र प्रकल्पा’ची विस्तृत रूपरेषा मांडली. KDMC च्या Chief Medical Officer डॉ. दीपा शुक्ला यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात केंद्र सरकारने २०३२ पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याचे ध्येय ठेवले असल्याचे स्पष्ट केले. रुग्णांना औषधोपचारांसोबतच चांगल्या पोषणाची गरज असते, हे ओळखून रोटरी क्लबने सुरु केलेल्या या उपक्रमाचे त्यांनी मनापासून कौतुक केले.

पोषण किट आणि दानशूर दात्यांचा सन्मान
या प्रकल्पांतर्गत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या प्रत्येक किटमध्ये ३ किलो गहू, १ किलो तूरडाळ, ३ किलो कडधान्ये आणि १ लिटर खाद्यतेल यांचा समावेश आहे. या उपक्रमासाठी अवघ्या एका महिन्यात ₹२,५०,००० पेक्षा अधिक निधी उभारणाऱ्या २८ दात्यांचा कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला. यानंतर उपस्थित ५० क्षयरोगग्रस्त लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकल्प संचालक Rtn. वर्धमान पाटील, प्रकल्प अध्यक्ष Rtn. चंद्रशेखर शिंदे, सह-अध्यक्ष Rtn. उमा सिंग, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टचे सेक्रेटरी Rtn. सुबोध पटवर्धन व त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक करण्यात आले. Rtn. Adv. संजय कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

