रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टचा कौतुकास्पद उपक्रम; क्षयरुग्णांना मिळणार पोषणाचा आधार!
‘निक्षय मित्र’ उपक्रमाचे शुक्रवारी उद्घाटन; केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची प्रमुख उपस्थिती
डोंबिवली:
क्षयरोगाविरुद्धच्या (टीबी) लढ्यात रुग्णांना वैद्यकीय उपचारांसोबतच योग्य पोषण मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. हीच गरज ओळखून रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टच्या वतीने क्षयरुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘निक्षय मित्र प्रकल्प’ हा विशेष सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता डोंबिवली पूर्व येथील रोटरी भवन येथे होणार आहे.
उपक्रमांतर्गत क्षयरुग्णांना उपचाराच्या काळात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पौष्टिक अन्नधान्याचे वाटप केले जाणार आहे. यामध्ये तांदूळ, डाळी, कडधान्ये, धान्य आणि स्वयंपाकाचे तेल यांसारख्या रोजच्या आहारातील अत्यंत महत्त्वाच्या घटकांचा समावेश असेल. योग्य पोषणामुळे रुग्णांच्या आरोग्यात जलद सुधारणा होण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. अभिनव गोयल (IAS) हे या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
क्षयरोगावरील उपचारात केवळ औषधे पुरेशी नसून रुग्णांना पोषण, मानसिक बळ आणि सामाजिक पाठबळ मिळणे तितकेच गरजेचे आहे. या सामाजिक भावनेतूनच रोटरी क्लबने हे पाऊल उचलले आहे. समाजात क्षयरोगाविषयी असलेली भीती दूर करून जनजागृती घडवून आणण्यासाठी आणि सामूहिक सहभाग वाढवण्यासाठी प्रसारमाध्यमांचे सहकार्य मोलाचे ठरणार असल्याचे मत व्यक्त करत सर्व पत्रकार बंधू-भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष रोटरीयन अथर्व जोशी व मानद सचिव रोटरीयन सुबोध पटवर्धन यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रम तपशील:
दिनांक: शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६
वेळ: सायंकाळी ५.०० वाजता
स्थळ: रोटरी भवन, डोंबिवली पूर्व
प्रमुख पाहुणे: मा. श्री. अभिनव गोयल, IAS (आयुक्त, केडीएमसी)

