भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’; सोमनाथ मंदिराच्या पुरातन अवशेषांचे होणार दर्शन
मुंबई: सध्याच्या अस्थिर जागतिक परिस्थितीत भारताला आध्यात्मिक संरक्षककवच लाभावे आणि देशात पुन्हा ‘रामराज्या’चा उदय व्हावा, या संकल्पनेतून सनातन संस्थेच्या वतीने मुंबईत ‘श्री राजमातंगी महायज्ञा’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य सोहळा रविवार, १७ मे २०२६ रोजी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराजवळील नर्दुल्ला टँक मैदानावर दुपारी ३:३० ते सायंकाळी ७:३० या वेळेत पार पडणार आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी ही माहिती दिली. यावेळी संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. चेतन राजहंस, ज्योतिर्विद श्री. श्रेयस पिसोळकर आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. कैलास पाटील उपस्थित होते.
यज्ञाचे वैशिष्ट्य आणि ऐतिहासिक महत्त्व
आध्यात्मिक लढा: हा यज्ञ केवळ धार्मिक विधी नसून राष्ट्ररक्षणासाठी दिलेला एक आध्यात्मिक लढा असल्याचे संस्थेने म्हटले आहे.
राजमातंगी देवीचे सामर्थ्य: दशमहाविद्यांपैकी एक असलेली मातंगीदेवी आदिशक्तीची ‘प्रधानमंत्री’ मानली जाते. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी आणि प्रतिकूल परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही उपासना फलदायी ठरते.
सोमनाथ मंदिराचे अंश: १००० वर्षांपूर्वी महंमद गझनीने भग्न केलेल्या सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे पवित्र अवशेष या ठिकाणी दर्शनासाठी ठेवले जाणार आहेत. भाविकांसाठी ही एक दुर्मिळ संधी असेल.
यज्ञाचे स्वरूप आणि उपस्थिती
तामिळनाडू येथील आगमाचार्य श्री. अरुणकुमार गुरुमूर्ती यांच्या पौरोहित्याखाली हा यज्ञ संपन्न होईल. या सोहळ्याला मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमधील मंदिर विश्वस्त, संत-महंत, राज्य सरकारमधील मंत्री, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि सुमारे ५ हजार भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
सनातन संस्थेने आतापर्यंत ७५० हून अधिक यज्ञ केले असून, राष्ट्रउभारणीच्या या ऐतिहासिक पाऊलात सर्व हिंदूंनी सहकुटुंब सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
